विखे पाटलांच्या पाठपुराव्यामुळे ‘साकळाई उपसा सिंचन योजनेला’ मंजुरी!

संगमनेर Live
0
विखे पाटलांच्या पाठपुराव्यामुळे ‘साकळाई उपसा सिंचन योजनेला’ मंजुरी!

◻️​ मुख्यमंत्र्यांनी ‘शब्द’ पाळला; १,२३४ कोटींचा निधी अन् ४ वर्षात काम पूर्ण होणार

​संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | अहिल्यानगर (नगर) आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी संजीवनी ठरणारी ‘साकळाई उपसा सिंचन योजना’ अखेर कागदावरून प्रत्यक्षात उतरणार आहे. १ एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक पिढ्यांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सुटणार असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

​१६ एप्रिल २०१९ रोजी वाळकी येथील जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेला मंजुरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. तो शब्द आज पूर्ण झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.

​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण १,२३४.१३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून, पुढील चार वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेद्वारे सुमारे ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाच्या नियोजनानुसार सिंचनासाठी १.६० टीएमसी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ०.२० टीएमसी अशा एकूण १.८० टीएमसी पाण्याचे वितरण केले जाईल. खरीप हंगामात म्हणजेच १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीत म्हैसगाव येथून चार टप्प्यांत पाणी उपसा करून या भागातील जलसाठ्यांचे पुनर्भरण केले जाणार आहे.

​ही योजना तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असून, पाणी तब्बल २०८.३४ मीटर उंचीवर उपसा करून चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात सोडले जाईल. यासाठी म्हैसगाव येथे तातडीने पंपगृह बांधले जाणार असून एकूण चार पंपगृहे आणि तीन वितरिकांद्वारे पाण्याचे नियोजन केले जाईल. यातून स्थानिक पाझर तलाव, लघू तलाव आणि नाला बंधारे भरून घेतले जातील. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३९.७१ हेक्टर क्षेत्रापैकी ३०.२२ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार आहे.

​डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेळोवेळी ही योजना पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. “ही योजना आम्हीच पूर्ण करू,” हा त्यांचा विश्‍वास आज सार्थ ठरला आहे. याकामी माजी आमदार बबनराव पाचपुते, आमदार विक्रम पाचपुते आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले.

“साकळाई योजना हा केवळ प्रकल्प नसून या भागातील जनतेची अस्मिता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्यामुळे आज हा शब्द पूर्ण झाला आहे. ३२ गावांचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान ​या मंजुरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती होणार असल्याचे चित्र दिसत असून दुष्काळी पट्ट्याला आता कायमस्वरूपी दिलासा मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !