एकाचं दिवशी स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यात २४ ठिकाणी छापे!

संगमनेर Live
0
एकाचं दिवशी स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यात २४ ठिकाणी छापे!

◻️ शिर्डी, आश्‍वी, नेवासा, श्रीगोंदा आदि ठिकाणाहून १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मंगळवारी जिल्ह्याभरात धडक मोहीम राबवत अवैध दारू विक्रेत्यांवर जोरदार प्रहार केला. या धडक कारवाईत जिल्ह्याच्या विविध भागात २४ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी मोठे यश मिळवले असून, यामुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे ​पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार तातडीने सूत्रे हलवत मोहिमेचे नियोजन केले. सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये आणि पोलीस उप निरीक्षक महादेव गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली पाच विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमध्ये अनुभवी पोलीस अंमलदारांचा समावेश करून त्यांना जिल्ह्याच्या दुर्गम आणि संवेदनशील भागात अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी रवाना करण्यात आले होते.

​मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी या पाचही पथकांनी अत्यंत गोपनियतेने तपास चक्रे फिरवली. यामध्ये प्रामुख्याने शिर्डी, एम.आय.डी.सी. परिसर, संगमनेर तालुका, नेवासा, श्रीगोंदा, आश्‍वी, कोतवाली आणि तोफखाना या पोलीस स्टेशनच्या हद्दीत धाडी टाकण्यात आल्या. त्याचप्रमाणे श्रीरामपूर शहर, सोनई आणि राहुरी परिसरातही अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकले. संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ही मोहीम राबवल्यामुळे अवैध व्यावसायिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

​या संपूर्ण धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण २४ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत १ लाख ३६ हजार ८४२ रुपये किमतीचा अवैध दारूसाठा आणि अन्य संबंधित मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि सलग कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सामान्यांतून या कारवाईचे स्वागत होत आहे.

दरम्यान ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उप निरीक्षक महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णू भागवत, विजय पवार, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, सुयोग सुपेकर, दिपक घाटकर, राहुल द्वारके, शाहिद शेख, गणेश धोत्रे, रिचर्ड गायकवाड, भीमराज खर्से, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, भगवान थोरात, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, रोहित येमुल, प्रकाश मांडगे आणि रमिजराजा आत्तार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !