६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

संगमनेर Live
0
६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

​◻️जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर अन्न शिजवून सरकारचा निषेध करणार

संगमनेर LIVE (​मुंबई) | राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आता सर्वसामान्यांच्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न बनला आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या ६ एप्रिल रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आज मुंबईतील पत्रकार परिषदेत करण्यात आली. 

बुधवारी १ एप्रिल रोजी मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी मुंबई महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, आणि युवक मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर खरात उपस्थित होते.

​या आंदोलनाच्या स्वरूपाविषयी माहिती देताना सांगण्यात आले की, ६ एप्रिल रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन रस्त्यावर चुली मांडणार आहेत. गॅसअभावी जनतेला पुन्हा एकदा जुन्या काळाप्रमाणे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे, हे या आंदोलनातून सरकारला प्रकर्षाने दाखवून दिले जाणार आहे. आंदोलक कार्यकर्ते तिथेच अन्न शिजवून ते अन्न आणि मागणीचे निवेदन घेऊन जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना भेट देतील आणि आपला निषेध नोंदवतील.

​गॅस टंचाईचा फटका केवळ शहरांनाच नाही, तर ग्रामीण भागातील जनतेलाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. सद्यस्थितीत गॅसला पर्याय म्हणून नागरिक इंडक्शन कुकर आणि इलेक्ट्रिक प्लेट्स खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा शोध घेत आहेत, मात्र तिथेही या वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. दुसरीकडे, या टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक आणि केटरर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, अनेक ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्यामुळे नियोजित लग्नसोहळे देखील पुढे ढकलावे लागत असल्याचे दाहक वास्तव पत्रकार परिषदेत मांडण्यात आले.

​यावेळी नेत्यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आणि भाजप सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. एकीकडे सर्वसामान्य एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील लोकांना २५-२५ दिवस गॅससाठी वेटिंगवर राहावे लागते, तर दुसरीकडे मंत्र्यांच्या वशिल्याने ठराविक धनदांडग्यांच्या घरी गॅस सहज पोहोचवला जातो, असा आरोप पक्षाने केला आहे. भाजपची ही दुहेरी आणि जातीवादी भूमिका जनता सहन करणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, ​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ६ एप्रिल रोजी होणाऱ्या या आंदोलनात सर्वसामान्य जनता, छोटे व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारला जाब विचारावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !