सात्रळच्या शिवारात बिबट्याचा बछडा जेरबंद!
◻️ एका महिन्यापासून सुरू असलेल्या दहशतीला लगाम?
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ शिवारात गेल्या महिनाभरापासून पसरलेली बिबट्याची दहशत काही अंशी कमी झाली आहे. सात्रळ-ताभेरे रस्त्यावरील पलघडमल आणि साबळे वस्ती शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याचं एक मादी पिल्लू जेरबंद झाले.
सात्रळ शिवारातील गट नंबर २९०/२ मध्ये दावीद फकिरा पलघडमल यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या कुटुंबाचा वावर वाढला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाने सहा दिवसांपूर्वी या ठिकाणी पिंजरा लावला होता. सावज म्हणून पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी (दि. १ एप्रिल) मध्यरात्री २ वाजता कोंबड्यांच्या आवाजाकडे आकर्षित होऊन बिबट्याचे सुमारे एक वर्ष वयाचे मादी पिल्लू पिंजऱ्यात अडकले.
पहाटेच्या सुमारास प्रविण पलघडमल यांनी बॅटरीच्या सहाय्याने पिंजऱ्याची पाहणी केली असता, त्यांना पिंजऱ्यात जेरबंद झालेले पिल्लू दिसले. मात्र, त्याच वेळी पिंजऱ्याबाहेर आणखी एक पिल्लू आणि एक मोठी मादी बिबट्या (मादी) वावरताना दिसून आली. हा थरारक अनुभव आल्यानंतर त्यांनी तातडीने राहुरी वनविभाग आणि प्राणीमित्र विकास म्हस्के यांना पाचारण केले.
घटनेची माहिती मिळताच वनपाल एस. आर. कोरके, वनरक्षक घुगे, बी. आर. दिवे, एस. आर. झंझट, वन कर्मचारी पठाण, अनिल जाधव आणि प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उप वनसंरक्षक गणेश मिसाळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जेरबंद बिबट्याला दुसऱ्या पिंजऱ्यात सुरक्षितपणे हलवण्यात आले.
अजूनही परिसरात मोठी मादी आणि दुसरे पिल्लू मुक्त असल्याने धोका कायम आहे. हे लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने रिकामा केलेला पिंजरा पुन्हा त्याच ठिकाणी लावला आहे. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. या बचाव कार्यात प्रविण पलघडमल, सचिन पलघडमल, प्रभाकर पलघडमल आणि राजु साबळे यांनी वनविभागाला मोलाची मदत केली.
दरम्यान परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि एकटे बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.