शक्ती आणि भक्तीचा संगम असलेला हनुमानाचा रथ शेकडो महिलांनी ओढला!

संगमनेर Live
0
शक्ती आणि भक्तीचा संगम असलेला हनुमानाचा रथ शेकडो महिलांनी ओढला!

◻️ सौ. नीलम खताळ यांच्यासह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

​संगमनेर LIVE | ‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘प्रभू रामचंद्र की जय’ अशा जयघोषाने संगमनेर शहर दुमदुमून गेले. संगमनेरची ऐतिहासिक परंपरा जपत याही वर्षी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ आणि शेकडो महिलांनी एकत्र येत हनुमानाचा रथ ओढला. भक्ती आणि महिला सक्षमीकरणाचा हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

​हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सकाळी ८ वाजता संगमनेर शहर पोलीस स्टेशनपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी हातात भगवा ध्वज घेऊन वाजत-गाजत मिरवणूक चंद्रशेखर चौकात आणली. सजवलेल्या रथावर विधिवत भगवा ध्वज लावल्यानंतर आमदार अमोल खताळ व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते मारुतीरायाची महाआरती करण्यात आली.

​आरतीनंतर खऱ्या अर्थाने सोहळ्याचे आकर्षण ठरलेला क्षण आला. शेकडो महिलांनी रथाचा दोर हातात धरून चंद्रशेखर चौकापर्यंत रथ ओढला. ही मिरवणूक रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगर पालिका, चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट आणि नेहरू चौक या मार्गाने फिरून पुन्हा मोठ्या मारुती मंदिराजवळ विसर्जित झाली.

​यावेळी भावना व्यक्त करताना सौ. नीलम खताळ म्हणाल्या, “संगमनेरची ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. हनुमान हे शक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहेत. हा रथ ओढताना महिलांमध्ये एक वेगळी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होतो. ही परंपरा स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ करणारी आहे.”

​उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, राजाभाऊ देशपांडे, वरद बागुल, शुभम लाहामगे आणि महिला शक्ती सदस्या देवयानी जोशी यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !