औषध निर्माणशास्त्रात विद्यार्थ्याना करिअरच्या मोठ्या संधी - सौ. विखे पाटील
◻️ प्रवरा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या 'उडान २०२६' स्नेहसंमेलन संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) या विषयामध्ये भविष्यात करिअरच्या अत्यंत मोठ्या आणि वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध असून, विद्यार्थ्यानी या संधींचा लाभ घेऊन समाजाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योगदान द्यावे. प्रवरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्याना जो आत्मविश्वास दिला जातो, त्या बळावर त्यांनी जागतिक स्तरावर आपले यश सिध्द करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय (डिप्लोमा) आणि इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या ‘उडान २०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
या प्रसंगी व्यासपीठावर कैलास सोमानी, गणपतराव शिंदे, अलका दिघे, भारत घोगरे, डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव, प्रा. चैताली भवर, डॉ. सुहास सिध्देश्वर आदी सह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. विखे पाटील म्हणाल्या की, संस्थेचे माजी विद्यार्थी हेच खऱ्या अर्थाने संस्थेचा कणा असून त्यांच्या माध्यमातूनच संस्थेला बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते. यामुळे प्रवराच्या विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्ये आत्मसात करून दिली जातात. संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्य आधारित शिक्षणावर विशेष भर दिला जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी जागतिक पातळीवर झेप घ्यावी, हेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न होते. आज प्रवराच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम होत आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात उंच भरारी घ्यावी आणि ही भरारी घेत असताना विखे पाटील परिवार कायमच त्यांच्या सोबत राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी कैलास सोमानी आणि डॉ. शिवानंद हिरेमठ यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कुलकर्णी आणि साक्षी पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. चैताली भवर यांनी मानले. प्रवरा परिवाराचा आत्मविश्वास आणि विद्यार्थ्याचे कष्ट यांच्या जोरावर औषधनिर्माण क्षेत्रात लोणीचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल होईल, असा विश्वास या सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.