रामगड डोंगरावर बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मंदिरांचे कलशारोहण!
◻️ सायखिंडीत महादेव, खंडोबा आणि जाणकामाता मंदिरांची प्राणप्रतिष्ठा
संगमनेर LIVE | निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या सायखिंडी गावच्या लगत असलेल्या ऐतिहासिक रामगड डोंगरावर हनुमान जयंतीचे औचित्य साधून सोहळा पार पडला. काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महादेव मंदिर, खंडोबा मंदिर आणि जाणकामाता मंदिराचे कलशारोहण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीने करण्यात आले. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
हनुमान जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात महंत दयानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत विधीवत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण पार पडले. या निमित्ताने गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
हनुमान जयंतीच्या या मंगल समयी गावातील महिलांनी अतिशय सुंदर अशी पारंपरिक वेशभूषा केली होती. डोक्यावर मंगल कलश, हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदुंगाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या साथीने भव्य दिंडी काढण्यात आली. मंत्रोच्चार आणि ‘राम-हनुमान’च्या उद्घोषात संपूर्ण रामगड डोंगर दुमदुमून गेला होता. सायखिंडीसह परिसरातील नागरिक, महिला आणि तरुणांनी या सोहळ्याला प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसराला एका मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राच्या समृध्द संत परंपरेचा गौरव केला. ते म्हणाले की, “महाराष्ट्राला थोर संत, महात्मे आणि समाजसुधारकांची मोठी परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वाना सामावून घेणारा असून, संतांनी दिलेला मानवतेचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे.”
थोरात यांनी पुढे नमूद केले की, “छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला समानतेचा आणि लोकशाहीचा मार्ग दाखवला आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन मानवाच्या कल्याणासाठी काम करणे, हाच खरा धर्म आहे. सर्वानी मानवता धर्म बळकट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत.”
दरम्यान याआधी गावातील युवकांनी काढलेली भव्य दिंडी या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली. शिस्तबद्ध मांडणी आणि उत्साही वातावरणामुळे या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. या सोहळ्यामुळे रामगड डोंगर आता केवळ निसर्गरम्य पर्यटन स्थळ न राहता एक जागृत देवस्थान म्हणूनही ओळखले जाणार आहे.