शिवजयंतीनिमित्त बस स्थानक परिसरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला!
◻️ संगमनेर महायुती व हिंदुत्ववादी संघटनांच्या उपस्थितीत महाआरती!
संगमनेर LIVE | छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधून संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेना - महायुतीच्या वतीने आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष संकल्पनेतून संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य आणि देदीप्यमान अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यामुळे संपूर्ण परिसराला एक ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले असून तो सर्व शिवभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी अतिशय भक्तीमय वातावरणात शिवपूजन करण्यात आले. सौ. नीलम खताळ, राहुल खताळ तसेच मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी आणि भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे यांच्यासह महायुती व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मंत्रोच्चारात महाराजांना अभिवादन केले. यावेळी झालेली महाआरती हा सोहळा उपस्थित जनसमुदायासाठी अविस्मरणीय ठरला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा देखणा अश्वारूढ पुतळा साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, “शहरात अश्वारूढ पुतळाचं उभारला जाईल” अशा आशयाचे फलक संपूर्ण शहरात झळकल्याने नागरिकांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठी उत्सुकता आणि अभिमान दिसून येत आहे.
बस स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी पुतळा उभारल्याने प्रवाशांचे आणि शिवभक्तांचे तो खास आकर्षण ठरला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वानीच या अश्वारूढ पुतळ्यासमोर उभे राहून फोटो काढले आणि आपल्या मोबाईलमध्ये हे ऐतिहासिक क्षण कैद केले. संपूर्ण संगमनेरकरांसाठी हा पुतळा केवळ एक स्मारक नसून तो प्रेरणेचा स्रोत ठरत असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमीमधून उमटत आहे.