धांदरफळ खुर्द येथे उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’
◻️पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते उध्दघाटन; महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली!
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर परिसरामध्ये उद्या शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न होणार असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या महसूल अभियानांतर्गत धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, गोडसेवाडी, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, निमगाव बुद्रुक, निमगाव खुर्द, पेमगिरी, सांगवी, कौठे धांदरफळ, सावरचोळ, धुपे, मेंगाळवाडी आणि शिरसगाव या गावांतील नागरिकांना विविध महसुली सेवांचा लाभ घेता येईल.
या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ उताऱ्यांमधील चुकांची तत्काळ दुरुस्ती करणे आणि डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ व ८-अ उतारे वाटप केले जाणार आहे. त्याचप्रमाणे उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन-क्रीमीलेअर यांसह विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे सर्व शालेय दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
याशिवाय, अकृषिक (NA) परवानगी व नवीन 'सनद' प्रक्रियेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभांची मंजुरी, ई-मोजणी अर्ज आणि घरांसाठी पट्टे वाटप यांसारख्या सुविधाही येथे मिळतील. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणांचा निपटारा करणे, पीएम किसान व ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्ययावत करणे आणि भूसंपादन संदर्भातील ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याचे कामही याठिकाणी युध्दपातळीवर केले जाणार आहे.
दरम्यान नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांसाठी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी या ‘महाराजस्व अभियान’ शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.