प्रगतीशील, शाश्‍वत आणि सर्वसमावेशक सुशासनाचा अर्थसंकल्प!

संगमनेर Live
0
प्रगतीशील, शाश्‍वत आणि सर्वसमावेशक सुशासनाचा अर्थसंकल्प!

◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत



संगमनेर LIVE | महाराष्ट्र राज्याचा २०२६ चा अर्थसंकल्प हा दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी असल्याची प्रतिक्रिया संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. कृषी, ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उंचावण्याला प्राधान्य देत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप या अर्थसंकल्पातून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्याचा कृषी जीडीपी सध्याच्या ५५ अब्ज डॉलर्सवरून ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेतमालाला जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विविध पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी विकसित करणे तसेच शेतकरी कल्याणासाठी डिजिटल साधनांचा वापर वाढविणे यांसारख्या उपक्रमांमुळे कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल, असे आमदार खताळ यांनी नमूद केले.

याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून शेतपाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण केल्याने ग्रामीण भागातील शेती आणि वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याची तरतूद ही शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.

ग्रामीण आणि वंचित घटकांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतमजूर सहभाग योजना’ तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेला या अर्थसंकल्पातून अधिक बळ देण्यात आले आहे. 

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी १००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये जाणारे रस्ते सिमेंट काँक्रिटने विकसित करण्याचा निर्णयही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले.

ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून सौरऊर्जेला चालना दिली जाणार असून, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच कुंभ मेळा आणि धार्मिक देवस्थानांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी बांबू उद्योग धोरण राबवण्याचा निर्णयही रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “हा अर्थसंकल्प दूरदृष्टी असलेला, महत्त्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी आहे. स्व. अजित पवार यांच्या कार्याचा वारसा जपत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास आणि कल्याण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकरी, ग्रामीण भाग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला आहे. या जनहितकारी आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

दरम्यान हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण करणारा असून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचा विश्‍वास देखील आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !