‘अथर्व ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीज’
अथर्व ॲग्रोचे संस्थापक बाळासाहेब उंबरकर यांना पीएच.डी. पदवी
◻️ संगमनेरच्या सुपुत्राचे जागतिक दर्जाचे संशोधन; ‘नमामी गंगे’ संकल्पनेला बळ
संगमनेर LIVE | अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन उद्योजकतेचा डोंगर उभा करणारे आणि आता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागतिक दर्जाचे संशोधन सादर करणारे संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावाचे सुपुत्र डॉ. बाळासाहेब विश्वनाथ उंबरकर यांना राजस्थान विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (पीएच.डी.) ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.
‘नॅचरल ॲडसॉर्बंट' (नैसर्गिक शोषक) वापरून नद्यांमधील विषारी जड धातू काढून टाकण्यावर त्यांनी केलेले संशोधन सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमामी गंगे’ या स्वप्नपूर्तीसाठी हे संशोधन अत्यंत मोलाचे ठरणार असल्याचा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
डॉ. बाळासाहेब उंबरकर यांचा प्रवास हा तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. १९९६ मध्ये एम.एस्सी. केमिस्ट्री पूर्ण करणारे ते उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) गावातील पहिले तरुण आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना त्यांचे आतेभाऊ तथा प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर यांच्या घरी राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीची तीन वर्षे खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर उद्योजकतेत पाऊल टाकले.
गेल्या २६ वर्षापासून त्यांनी सिन्नर येथे ‘अथर्व ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. लिक्विड सोप आणि क्लिनिंग मटेरियलपासून सुरू झालेला हा प्रवास आता सूक्ष्म अन्नद्रव्य खते, पीक संजीवके आणि कीडनाशकांच्या उत्पादनापर्यंत पोहोचला आहे. २००७ मध्ये त्यांनी स्वतःच्या जागेत अद्ययावत पाणी, माती आणि देठ परीक्षण प्रयोगशाळा उभारून शेतकऱ्यांना तांत्रिक मदतीचा हात दिला आहे.
डॉ. बाळासाहेब उंबरकर यांनी त्यांच्या पीएच.डी. प्रबंधासाठी ‘नैसर्गिक शोषक वापरून जड धातू काढून टाकणे’ (Removal of heavy metals by using Natural Adsorbent) हा अत्यंत कल्पक विषय निवडला होता. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी बागेच्या छाटणीनंतर उरलेल्या फांद्या अनेकदा जाळून टाकतात, ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते आणि प्रदूषण वाढते. उंबरकर यांनी आपल्या संशोधनातून या टाकाऊ फांद्यांचा वापर करून नद्यांमधील प्रदूषित आणि विषारी धातू शोषून घेणारे नैसर्गिक घटक तयार केले आहेत. या अभिनव संशोधनामुळे एकीकडे नद्यांचे प्रदूषण कमी होऊन त्या स्वच्छ होण्यास मदत होईल आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कष्टाच्या टाकाऊ कचऱ्याला योग्य मोल प्राप्त होऊन त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्गही उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे.
या संशोधनासाठी त्यांना प्रवरेचे माजी प्राचार्य डॉ. कुचेकर आणि प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, त्यांचे जागतिक दर्जाच्या ‘स्कोपस इंडेक्स्ड जर्नल' मध्ये पाच शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. उंबरकर यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून शिक्षणाच्या क्षेत्राला मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ उंबरी बाळापूर माध्यमिक विद्यालयाला ५१ हजार रुपयांची देणगी दिली, ज्यातून दरवर्षी १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्याना बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जाते.
याव्यतिरिक्त, नाशिकमधील के. व्ही. एन. नाईक कॉलेजला आणि एम. एस. कोठारी अकॅडमीला विद्यार्थ्याच्या सोयीसाठी प्रत्येकी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यांचा मुलगा सध्या जर्मनी येथे ‘एम.एस.’ (M.S.) चे उच्च शिक्षण घेत आहे. शिक्षण आणि दातृत्व यांचा हा सुंदर संगम खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
केवळ उद्योग आणि संशोधनच नव्हे, तर डॉ. बाळासाहेब उंबरकर हे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिस्ट्रक्चरिंग बोर्डा'वर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत, तसेच ‘पोलीस टाईम्स' या वृत्तपत्राचे नाशिक प्रतिनिधी म्हणूनही ते काम पाहतात.
दरम्यान त्यांच्या या बहुविध यशाबद्दल आणि पीएच.डी. मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यांचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील, ज्येष्ठ नेते रामभाऊ भुसाळ यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील नामवंतासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.