अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार - मंत्री विखे पाटील
◻️ शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंद्यात औद्योगिक वसाहतींच्या कामांना वेग
संगमनेर LIVE (लोणी) | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा मोठा लाभ आता अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार आहे. जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात मुख्य केंद्र बनविण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात नुकतीच एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहतींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासकीय स्तरावरील सर्व अडचणी तातडीने दूर करून कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या नियोजित प्रकल्पांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला वेळेचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठाची जागा औद्योगिक विकासासाठी उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या औद्योगिक विस्तारामुळे स्थानिक स्तरावर उद्योगांचे जाळे निर्माण होऊन जिल्ह्याचा आर्थिक कायापालट होईल आणि पर्यायाने स्थानिक तरुणांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
“अहिल्यानगर जिल्हा लवकरच औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून नावारूपास येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्यात मोठी गुंतवणूक येत असून, यामुळे जिल्ह्याचा कायापालट होईल.” असा विश्वास नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.