कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी आता तरी थांबणार का?

संगमनेर Live
0
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी आता तरी थांबणार का?

◻️अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांद्याच्या प्रश्नावर आमदार अमोल खताळ कडाडले

​संगमनेर LIVE | मागील दोन वर्षापासून सततच्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अत्यंत आक्रमकपणे मांडला. वाढता उत्पादन खर्च आणि मातीमोल बाजारभाव यामुळे बळीराजा उद्ध्वस्त होत असल्याची दाहक वास्तवता त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. केवळ आश्‍वासनांनी प्रश्न सुटणार नाही, तर सरकारने आता ठोस कृती करण्याची वेळ आली आहे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

​सभागृहात बोलताना आमदार खताळ यांनी आकडेवारीसह शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, आज एकरी कांदा पिकवण्यासाठी खते, बियाणे, मजुरी आणि औषधांचा खर्च १ लाख रुपयांच्या पार गेला असताना, बाजारात मात्र कांद्याला केवळ ८ ते १० रुपये प्रति किलो इतका अत्यल्प दर मिळत आहे. या व्यस्त प्रमाणामुळे कष्टाचे मोल शून्य ठरत असून साधा लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून बळीराजा आज आर्थिक विवंचनेच्या टोकावर उभा आहे.

​आमदार खताळ यांनी बाजारपेठेतील अस्थिर धोरणांवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले. वारंवार बदलणारे निर्यात धोरण आणि अचानक लादली जाणारी निर्यातबंदी यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्‍वभूमीवर, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला रास्त हमीभाव जाहीर करावा, तसेच तोट्यात असलेल्या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज देऊन थेट मदत करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. केवळ तांत्रिक चर्चा न करता सरकारने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसावेत, असे आवाहन त्यांनी केले.

“शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच देश मजबूत राहील. माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्कासाठी माझा लढा कायम राहील. सरकारने आता बळीराजाला आधार द्यावा.” अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !