‘ज्ञानेश्‍वरी’मध्ये अनाथाला सनाथ करण्याचे सामर्थ्य - युवराज महाराज देशमुख

संगमनेर Live
0
‘ज्ञानेश्‍वरी’मध्ये अनाथाला सनाथ करण्याचे सामर्थ्य - युवराज महाराज देशमुख

◻️ सद्गुरु नारायणगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याचे पाचवे पुष्प

संगमनेर LIVE (​नेवासे) | “छत्रपती शिवाजी महाराज हे राजयोगातले साधू होते, तर ज्ञानेश्‍वर माऊली हे योगी पुरुषांमधील ‘साधू राजे’ होते. ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथ केवळ पुस्तक नसून ती माऊलींनी दिलेली शिदोरी आहे. या ग्रंथाचे श्रध्दापूर्वक वाचन केल्यास अनाथाला सनाथ करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्‍वरीत आहे,” असे प्रतिपादन कीर्तनकार ह.भ.प. युवराज महाराज देशमुख यांनी केले.

​नेवासे येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याच्या पाचव्या दिवसांचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

​कीर्तनादरम्यान सुख आणि संसारावर भाष्य करताना महाराज म्हणाले की, “आज वारकरी संप्रदायाला समाजात जो सन्मान मिळतो, तो केवळ माऊली, तुकोबाराय आणि सकल संतांच्या कृपेमुळे आहे. सुखाचे स्वहीत, विहित, आवृत्त आणि अनावृत्त असे चार प्रकार असून प्रत्येकाला आपली जबाबदारी समजली की जीवनात स्थिरता येते.” संतांनी संसाराचा अतिरेकी ताण न घेण्याचा सल्ला दिला असून, आपण असू वा नसू संसाराचे रहाटगाडगे कधीच थांबत नाही, त्यामुळे परमार्थाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले. संतांच्या विचारात राहणे हीच सुखाची सर्वोच्च अनुभूती असल्याचेही त्यांनी नमूद केले.

​सद्गुरु आश्रमाच्या जागेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ही जागा मुळातच पवित्र असून येथे प्रत्येक कार्याला यश मिळते. महंत उध्दव महाराज हे सर्व तरुण साधकांवर पुत्रवत प्रेम करतात आणि त्यांना मौलिक मार्गदर्शन करतात, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कीर्तनानंतर विविध माध्यमातून सेवा देणाऱ्या दात्यांचा महाराजांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी उपस्थित मान्यवर, कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि भाविकांचे स्वागत करून आभार मानले.

​या मंगलमय सोहळ्यासाठी विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ आणि सेवा लाभली. संतपूजन सेवा विक्रांत शिंदे व प्रा. रमेश शिंदे (शिवशंभो प्रतिष्ठान हिंदुस्थान) यांच्या वतीने करण्यात आली. भाविकांच्या भोजनासाठी यशवंतराव ताकटे व अमोल ढोकणे यांच्याकडून अल्पोपहार, तर गोविंदराव वाकचौरे आणि ॲड. संजय कोतकर यांच्या वतीने दुपार व संध्याकाळच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. 

तसेच सुरेगावगंगा, बोरगाव, जैनपूर, नेऊरगाव आणि हैबतपूर येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि स्व. भगवानराव शिंदे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर शिंदे यांच्या वतीने आमटी-भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !