शिर्डीत ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे शाही स्वागत!

संगमनेर Live
0
शिर्डीत ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे शाही स्वागत!

◻️ ​जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला ‘महाराष्ट्र दुष्काळमुक्ती’चा निर्धार

संगमनेर LIVE (​शिर्डी) | संपूर्ण जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश देणाऱ्या श्रीक्षेत्र शिर्डीत आज भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आगमन झाले. अहिल्यादेवींच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही यात्रा शिर्डीत दाखल होताच संपूर्ण परिसर अहिल्यादेवींच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही 'गोदा ते नर्मदा' जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथून एक आणि अहिल्यादेवींचे जन्मस्थान असलेल्या चोंडी येथून दुसरी अशा दोन यात्रांची सुरुवात झाली होती. या दोन्ही यात्रांचे शिर्डीत एकत्रिकरण झाले. यावेळी राज्यातील विविध नद्यांतून आणलेल्या जलकलशांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

​शिर्डीतील मल्हारी मार्तड मंदिरात जलकलशांचे पूजन करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये अहिल्यादेवींचा पुतळा आणि कलश असलेला रथ आकर्षणाचे केंद्र ठरला. यासोबतच पारंपारिक ‘धनगर नृत्य’ आणि चित्रफितींच्या माध्यमातून देण्यात आलेला जलसंवर्धनाचा संदेश शिर्डीकरांचे लक्ष वेधून घेत होता. विशेष म्हणजे, मंत्री विखे पाटील आणि इतर लोकप्रतिनिधींनी बसमधून प्रवास करत सर्वसामान्यांशी संवाद साधल्याने या यात्रेची चर्चा सर्वत्र रंगली होती.

​यानिमित्त आयोजित सांस्कृतिक सोहळ्यात बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धनाची जी चळवळ उभी केली, ती आजही प्रेरणादायी आहे. श्री दासगणू महाराजांनी ‘श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी’ हा ग्रंथ महेश्‍वरी येथे लिहिला, ज्यामुळे शिर्डी आणि महेश्‍वर या दोन नगरींचे आध्यात्मिक नाते जोडले गेले आहे."

​“या जलयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि तो पूर्ण करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे,” असेही विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

​सोमवारी ही यात्रा शिर्डीहून मध्य प्रदेशकडे रवाना होणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी खासदार वडतुके, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि शिर्डीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !