श्रीरामपुरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे अभूतपूर्व स्वागत!

संगमनेर Live
0
श्रीरामपुरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे अभूतपूर्व स्वागत!

◻️ ​पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य आयोजन


संगमनेर LIVE (​श्रीरामपूर) |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ चे आज श्रीरामपूर शहरात अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी, फुलांची सजावट आणि ‘पाणी वाचवा' अशा घोषणांनी संपूर्ण शहर भारावून गेले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जलजागृती यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मभूमीतून सुरू झालेली ही यात्रा त्यांच्या कर्मभूमीकडे, म्हणजेच महेश्‍वरीकडे प्रस्थान करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे जलसंपदा विभाग तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून ही यात्रा काढण्यात आली आहे. जलसंवर्धनाचे महत्त्व तळागाळातील नागरिकांपर्यत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असून ‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ या संकल्पनेतून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचा संदेश दिला जात आहे.

​यात्रेचे श्रीरामपुरात आगमन होताच हनुमान मंदिर परिसरात पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांसह जलाची आणि यात्रेची आरती केली. यानंतर यात्रेने शहरातील शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि गुरुद्वार या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शन घेतले. ठिकठिकाणी यात्रेचा सन्मान करण्यात आला आणि जलसंवर्धनाचा व्यापक संदेश समाजात पोहोचवण्यात आला.

या सोहळ्याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, संजय फंड, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड आणि तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, सिद्धार्थ फंड, दिपक चव्हाण, बंडुकुमार शिंदे, दिपक पटारे, नाना शिंदे, संजय गांगड, रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे, तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉ. शंकर मुठे, भीमराज बागुल आणि रुपेश हरकल यांसह महायुतीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे उत्साहात स्वागत केले. या सोहळ्यात महिला आणि युवकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

​याप्रसंगी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनात जे आदर्श घालून दिले, ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. ही यात्रा केवळ एक उपक्रम नसून जलसंवर्धनाचा तो एक लोकसंग्राम आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या यात्रेत अहिल्याबाई होळकर यांनी पाणी व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.

श्रीरामपूरमधील मुक्काम आटोपून ही यात्रा आता शिर्डीकडे रवाना होणार आहे. त्र्यंबकेश्‍वर येथून येणाऱ्या दुसऱ्या यात्रेसोबत ही यात्रा घृष्णेश्‍वरमार्गे महेश्‍वरला पोहोचेल, जिथे या भव्य यात्रेचा समारोप होईल. 

दरम्यान, या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात जलसंवर्धनाबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये पाणी वाचवण्याची भावना दृढ होताना दिसत आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !