संगमनेरात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
◻️ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून उपक्रम
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रिय भजन ‘रघुपती राघव राजाराम’ आणि ‘वैष्णव जन तो’ गाऊन वाचन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी दिलेल्या जोरदार शिवगर्जनेने परिसर दणाणून गेला आणि प्रत्यक्ष पुस्तक वाचनाला सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह शहरांतील सर्व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रत्येक नागरिकाला पुस्तकाची प्रत देण्यात आली.
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वस्तुनिष्ठपणे मांडणारे असून ते सद्यस्थितीत शिवविचारांचा जागर करणाऱ्यांना योग्य दिशा देणारे आहे. या पुस्तकातून महाराजांचा सर्व धर्माप्रती असलेला आदर, महिलांप्रती असलेली उदात्त दृष्टी आणि रयतेच्या हिताची राजनीती यांचे प्रभावी दर्शन घडते. महाराजांचे खरे विचार आणि स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्या सध्याच्या काही लोकांची वैचारिक दिशा यात काय तफावत आहे, हे हे पुस्तक स्पष्टपणे दर्शविते. कोणत्याही प्रकारचे वाचन न करता बेताल वक्तव्ये करणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक चपराक असून, शिवरायांचा हा समतेचा विचार घराघरात पोहोचणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नेहरू गार्डन येथे सामूहिक वाचन पूर्ण झाल्यानंतर हजारो नागरिकांनी शहरातून भव्य रॅली काढली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला होता. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला.
दरम्यान, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कायमच विकासासोबत सुसंस्कृत आणि पुरोगामी विचारांसाठी ओळखला जातो. संपूर्ण राज्याला दिशा देणाऱ्या या तालुक्याने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सर्व धर्म समभाव आणि सर्वाना सोबत घेऊन जाण्याची ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहील, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यानी व्यक्त केला.