बागेश्‍वर बाबा आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन!

संगमनेर Live
0
बागेश्‍वर बाबा आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन!

◻️​ संगमनेरकर रस्त्यावर; बाबा आणि बेताल आमदाराचा पुतळा जाळून तीव्र निषेध


संगमनेर LIVE |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या तथाकथित बागेश्‍वर बाबा ऊर्फ धीरेंद्र शास्त्री आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आज संगमनेरमध्ये जनक्षोभ उसळला. ‘मी संगमनेरकर’ आणि शहरातील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ‘जोडे मारो’ आंदोलनात शेकडो नागरिक आणि तरुण सहभागी झाले होते.

​आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून झाली. महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर, धीरेंद्र शास्त्री आणि संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत आंदोलकांनी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले आणि जोडे मारो आंदोलन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला.

​याप्रसंगी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी कडक शब्दांत सुनावले. त्या म्हणाल्या, “स्वतःला कितीही मोठा महाराज म्हणवून घेणारे लोक उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा शिव - फुले - शाहू - आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या मातीला संतांचा आणि शूरवीरांचा वारसा आहे. महाराजांच्या व्यासपीठावर असतानाही महायुतीचे नेते शांत राहिले, हे दुर्दैवी आहे. अशा वक्तव्यांना महाराष्ट्रात कधीही माफी मिळणार नाही.”

​डॉ. सुधीर तांबे यांनी शिंदे सरकारवर निशाना साधला. ते म्हणाले, “आमदार संजय गायकवाड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा. हे लोक समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. बागेश्‍वर सारखे भोंदू महाराज खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुजन समाजातील मुलांनी हे कटकारस्थान ओळखून अशा लोकांपासून दूर राहावे आणि समतेचा विचार स्वीकारावा.”

​या निषेध आंदोलनादरम्यान शिवरायांचा अवमान करणाऱ्या दोषींवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात संगमनेरमधील सर्वच राजकीय आणि सामाजिक विचारधारांचे लोक एकत्र आले होते. यामध्ये काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस, शिवसेना, आरपीआय, दलित पॅथर, सत्यशोधक विचार मंच, छात्र भारती, महिला काॅग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा धिक्कार असो” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण संगमनेर शहर दणाणून गेले होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !