पिकांना जीवदान! आज आढळा डाव्या कालव्याला पाणी सुटणार!
◻️ आमदार खताळांच्या प्रयत्नांनंतर मंत्री विखे पाटील यांचे जलयात्रेतून निर्देश
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील आढळा लाभ क्षेत्रातील गावांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. यामुळे उभी पिके पाण्याअभावी वाळून चालली होती. विशेषतः चिकणी आणि वडगाव लांडगा परिसरातील शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.
योगायोगाने, “गोदा ते नर्मदा” जलयात्रा आश्वी परिसरात असताना चिकणी येथील ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य विषद केले. खताळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही बाब जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर घातली.
शेतकऱ्यांची व्यथा आणि पिकांची अवस्था लक्षात घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आढळा डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. मंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली आणि रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कालव्याद्वारे पाणी प्रवाहित होणार आहे.
दरम्यान, ऐन गरजेच्या वेळी पाणी मिळाल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. "जर आज पाणी मिळाले नसते, तर आमची हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे वाया गेली असती," अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तत्परतेने निर्णय घेतल्याबद्दल चिकणी आणि वडगाव लांडगा येथील ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे विशेष आभार मानले आहेत.