अहंकाररूपी संसारावर विजय मिळवणाराच खऱ्या अर्थाने ‘शूर’ - ज्ञानेश्वर महाराज
◻️ सद्गुरु नारायणगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याचे चौथे पुष्प
श्री सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा बुद्रुक येथे ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये चौथ्या दिवसाचे कीर्तनपुष्प गुंफताना ज्ञानेश्वर महाराज बोलत होते.
महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या ‘जिंकावा संसार | येणें नावें तरी शूर ||’ या अभंगावर रसाळ निरूपण केले. ते म्हणाले की, जगात शुरांची संख्या कमी आहे. “माझ्यामुळेच सर्व काही चालते” हा मनुष्याचा भ्रम आहे. सर्व जग ईश्वराच्या सत्तेने चालते, हे विसरून मनुष्य नको तो भार मनावर घेतो आणि दुःखी होतो. देवाला भक्ताचा अभिमान कधीच सहन होत नाही; मात्र जेव्हा भक्त अनन्य भावाने देवाला शरण जातो, तेव्हा देव त्याचा अहंकार दूर करतो.
आजच्या धावपळीच्या युगात तरुण पिढीला केवळ पाश्चात्य शिक्षणाचीच नव्हे, तर अध्यात्मिक संस्कारांचीही मोठी गरज असल्याचे महाराजांनी आवर्जून सांगितले. “आईच्या मायेने ज्ञानोबाराय मार्गदर्शन करतात, तर बापाच्या अधिकाराने तुकोबाराय आपल्याला धोके सुचवतात. साधू-संतांच्या रागवण्यातही समाजाचे हितच दडलेले असते, जसे कडू औषध रोग बरा करते," असेही ते म्हणाले.
सद्गुरु जोग महाराज परंपरा आणि सद्गुरु गंगागिरी महाराज परंपरा यांचा अत्यंत जवळचा संबंध असल्याचे सांगून महाराजांनी ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज आणि उध्दव महाराज यांनी हा स्नेहभाव जपल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आश्रमात वारकरी साधक घडवण्याचे जे कार्य सुरू आहे, ते अत्यंत गौरवास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मंगलमयी सोहळ्यात विविध सेवा देणाऱ्या दात्यांचा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी मानले. याप्रसंगी संतोष थोरात, आप्पासाहेब दरेकर आणि सुभाषराव गवांदे यांच्या वतीने संतपूजन करण्यात आले.
भाविकांसाठी सकाळच्या अल्पोपहाराची सोय प्रशांत तनपुरे व सोपानराव दरंदले यांनी केली होती. दुपारी तुळशीराम निर्मळ यांच्या वतीने भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी होणाऱ्या महाप्रसादासाठी उस्थळखालसा, भालगाव, बहरवाडी व गोधेगाव येथील समस्त ग्रामस्थ मंडळींनी आमटी-भाकरीचा प्रसाद तयार करून सेवा दिली, ज्यामध्ये आनंदवन परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान, या सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.