जलसंवर्धनाचा वारसा जपण्यासाठी ‘जलयात्रा’ दिशादर्शक - आमदार पडळकर
◻️ जलयात्रेचे संगमनेर, जोर्वे, उंबरी बाळापूर आणि आश्वी येथे जल्लोषात स्वागत
.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरपासून निघालेली ही जलयात्रा रात्री उशिरा संगमनेरमध्ये दाखल झाली. घुलेवाडी आणि जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी मंत्री विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांचे स्वागत केले. संगमनेर महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) विद्यार्थ्यानीही या उपक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवत यात्रेचे स्वागत केले.
शहरातील ऑरेंज कॉर्नर येथे वारकरी सेवा संस्थेच्या सुमारे १०० विद्यार्थ्यानी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात जलयात्रींना मानवंदना दिली. पारंपारिक फेटा बांधून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शहरातील मुख्य मार्गावरून प्रवास करताना बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रवरा नदीच्या मंगलमय पूजनाने झाली. श्रीराम मंदिरात, ज्याचा जीर्णोध्दार खुद्द अहिल्यादेवींनी केला होता, तिथे महाआरती करण्यात आली. गंगामाईच्या घाटावर महिलांनी फुगड्या खेळून आणि युवकांनी हलगीच्या तालावर नृत्य करून अहिल्यादेवींचा जयजयकार केला. यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि हजारो जलयात्रींच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून प्रवरेचा जलकलश यात्रेत सुपूर्त करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, अहिल्यादेवींनी बांधलेले घाट, मंदिरे आणि बारव ही जलसंवर्धनाची मोठी साधने असून त्यांचे जतन करणे ही आपली सर्वाची जबाबदारी आहे. महायुती सरकार दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी कटिबध्द असून मंत्री विखे पाटील यांनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आमदार अमोल खताळ यांनी प्रवरा नदीचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला, तर ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांनी जलसाक्षरतेसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांचे कौतुक केले.
संगमनेर शहरानंतर ही यात्रा जोर्वे, उंबरी बाळापूर आणि आश्वी येथे पोहोचली. जोर्वेमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपस्थित आमदारांनी स्वतः फुगडी खेळून ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित केला.
दरम्यान, ग्रामीण भागातही या यात्रेला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून, जलसाक्षरतेचा संदेश घराघरात पोहोचत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री घेत असलेले परिश्रम या यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत.