‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे उद्या संगमनेरात सामूहिक वाचन!

संगमनेर Live
0
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे उद्या संगमनेरात सामूहिक वाचन!

◻️ ​आमदार संजय गायकवाड यांच्या विरुध्द निषेध आंदोलन

​संगमनेर LIVE | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वसमावेशक धोरणांचा जागर करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी उद्या, रविवारी संगमनेर शहरात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व राजकीय पक्ष आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने ‘शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे सामूहिक वाचन आणि त्यानंतर जाहीर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

​रविवारी (दि. २६ एप्रिल) सकाळी ८ ते १० या वेळेत शहरातील नेहरू गार्डन येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?' हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासावर प्रकाश टाकते. महाराजांनी १८ पगड जाती-धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य कसे उभे केले, याचा वस्तुनिष्ठ इतिहास या पुस्तकात मांडलेला आहे. याच पुस्तकाचे सामूहिक वाचन करून शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

​शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाबाबत आणि त्यातील संदर्भाबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीचा निषेध करण्यासाठी संगमनेरकर एकवटले आहेत.

​पुस्तकाच्या सामूहिक वाचनानंतर आणि छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, सकाळी १० वाजता संगमनेर बस स्थानक परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा धिक्कार करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

दरम्यान, ​या ऐतिहासिक वाचन सोहळ्यासाठी आणि निषेध आंदोलनासाठी संगमनेरमधील सर्व राजकीय पक्ष, पुरोगामी व समाजसेवी संघटना, युवक व महिला संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !