अहिल्यानगरमध्ये ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत!
◻️ महायुतीचे नेते अन् नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ‘गोदा ते नर्मदा -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ आज सायंकाळी ६ वाजता अहिल्यानगर शहरात दाखल झाली. भक्ती, परंपरा आणि जलजागृतीचा त्रिवेणी संगम असलेल्या या यात्रेचे शहरवासीयांनी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जंगी स्वरूपात स्वागत केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने शहरात या जलयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप-महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर माळीवाडा मार्गे ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. विशाल गणपती मंदिर येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पारंपरिक कलशाचे पूजन व आरती करण्यात आली. या सोहळ्यात वारकरी संप्रदायाचा मोठा सहभाग दिसून आला, तर महिलांनी फुगड्या खेळत आणि पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करत या सोहळ्यात अधिक रंगत भरली.
याप्रसंगी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “ही जलयात्रा केवळ एक प्रवास नसून, अहिल्यादेवींनी जलव्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या क्रांतीचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून ही यात्रा ‘चौंडी ते महेश्वर’ असा प्रवास करत आहे. महायुती सरकार पुढील तीन वर्षात जिल्ह्यातील एकही जलसंपदा प्रकल्प प्रलंबित ठेवणार नाही, असा आमचा निर्धार आहे.” ही जलयात्रा म्हणजे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळा नसून, भविष्यासाठी पाणी सुरक्षित करण्याचा एक संकल्प असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभारंभ प्रसंगी हजेरी लावली होती, तर विधान परिषद सभापती राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय खासदार रामराव वडकुते, आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संत-महंत आणि प्रशासकीय अधिकारी या यात्रेत सहभागी झाले होते.
जलजागृतीचा हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला वार्ताहर, ग्रामस्थ आणि महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. अहिल्यानगर शहरात झालेली ही प्रचंड गर्दी आणि नागरिकांचा उत्साह पाहता, ही जलयात्रा जलसंवर्धनाच्या चळवळीत एक नवा अध्याय जोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.