छत्रपतीं आणि महिलांचा अवमान खपवून घेणार नाही - डॉ. अजित नवले
◻️ आमदार गायकवाड आणि बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी
संगमनेर LIVE (शिर्डी) | छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनमानसात रुजवणारे ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या संदर्भात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य आणि बागेश्वर बाबांनी महाराजांबद्दल केलेले वादग्रस्त विधान यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रशांत अंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली असून त्यांना धमक्या दिल्या आहेत. “माता - भगिनींवरून त्यांनी वापरलेली भाषा कोणत्याही सभ्य समाजाला भूषणावह नाही. गायकवाड आणि त्यांच्या पक्षाचा पाठिंबा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारला आहे. अशा प्रवृत्तींना पाठीशी घालून मुख्यमंत्री कोणता संदेश देऊ इच्छितात?” असा सवाल डॉ. नवले यांनी उपस्थित केला आहे. नारी शक्ती आणि ‘नारी वंदन’च्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे महिलांचा असा अपमान करणाऱ्यांना सत्तेत सोबत ठेवायचे, हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.
दुसरीकडे, नागपूर येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कथावाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तथ्यहीन विधान केले. “महाराज थकले होते आणि त्यांनी आपली राजसत्ता रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केली होती,” असे विधान करून बागेश्वर बाबांनी इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप डॉ. नवले यांनी केला. या विधानावेळी मंचावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री आणि भागवत यांनी या विधानाचा निषेध का केला नाही? ते या विधानाचे समर्थन करतात का? असे बोचरे प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विचारले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. महिलांचा अवमान करणारे आमदार संजय गायकवाड यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून, छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगून जनभावना दुखावणारे बागेश्वर बाबा यांच्यावरही तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका घेतली आहे. या दोन्ही संवेदनशील प्रकरणांत मुख्यमंत्र्यांनी आपले मौन सोडून अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्याबद्दलची चुकीची विधाने आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्यांना दिली जाणारी ही वागणूक महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असे डॉ. नवले यांनी ठामपणे नमूद केले.