त्र्यंबकेश्वरमध्ये ‘गोदा ते नर्मदा जलयात्रे’चा उत्साहात शुभारंभ!
◻️ कुशावर्त तीर्थ येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
संगमनेर LIVE (नाशिक) | राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि शाश्वत करण्याच्या हेतूने आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चा आज त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात शुभारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत निघालेल्या या जलदिंडीने संपूर्ण परिसर जलजागृतीच्या संदेशाने दुमदुमून गेला होता.
गोदावरीचे उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ. शालीनी विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन झाले. त्यानंतर शहरातून भव्य जलदिंडी काढण्यात आली.
या मंगलप्रसंगी जुना आखाड्याचे महंत हरिसिंग महाराज आणि आनंद आखाड्याचे अध्यक्ष भगवान बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्र्यांच्या उपस्थितीत जलयात्रेची पालखी टाळ-मृदंगाच्या तालावर मार्गस्थ झाली. या सोहळ्यात आमदार हिरामण खोसकर, आमदार गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ आणि अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. त्र्यंबकेश्वर शहरातून निघालेल्या या उत्साही दिंडीचा समारोप श्री स्वामी समर्थ गुरूपीठ येथे करण्यात आला.
जलसंवर्धनाचा हा व्यापक संदेश समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, वैभव भागवत, नीलेश पाटील, तहसीलदार गणेश जाधव आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
दरम्यान, याप्रसंगी आचार्य तुषार भोसले यांच्यासह नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे पदाधिकारी, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने या जलदिंडीत सामील झाल्या होत्या.