महाराष्ट्र ही खऱ्या अर्थाने ‘संतभूमी’ - देविदास महाराज म्हस्के
◻️ सद्गुरु नारायणगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याचे तिसरे पुष्प
संगमनेर LIVE (नेवासे) | “उत्तर भारतातील राज्यांना ज्याप्रमाणे ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाते, अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायातील संतांचे अमूल्य योगदान राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची खरी ओळख ‘संतभूमी’ अशीच आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या विविध सीमांवर ‘संतभूमीत आपले सहर्ष स्वागत आहे’ असे फलक लावून या परंपरेचा गौरव केला पाहिजे,” असे प्रतिपादन वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांनी केले.
नेवासे येथे ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या तिसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना म्हस्के महाराज बोलत होते.
महाराजांनी आपल्या निरुपणातून मानवी जीवनातील दुर्मिळ गोष्टींवर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, मानवी जीवनामध्ये मनुष्यत्व, मुमुक्षता आणि महापुरुषांचा आश्रय मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. आजच्या काळात ब्रह्मज्ञानाशिवाय बोलणारी माणसे अनेक असली, तरी प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जन्मोजन्मीची साधना करावी लागते.
परमात्मा स्वरूपाला जाणून घेण्यासाठी वेदांचा आधार आवश्यक असून, शास्त्राचा सखोल अभ्यास न करता केवळ स्वतःला अनुकूल वचने घेणारा माणूस ‘मूर्ख' ठरतो. ज्या साधकाला खरी विद्या आणि ज्ञान हवे असते, त्याला सुख आणि झोपेचा मोह नसतो. आजच्या काळात स्वार्थापोटी माणसे गुरूलाही फसवतात, मात्र अंतःकरणात विषयाला थारा देणाऱ्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आपला महाराष्ट्र ज्ञानाने समृध्द असून वारकरी संतांची ही वैभवशाली परंपरा जपली पाहिजे, कारण संतांच्या विचारांवर चालल्यानेच मानवी जीवन खऱ्या अर्थाने समृध्द होते.
यावेळी म्हस्के महाराजांनी नारायणगिरी महाराज यांचा ‘चालते-बोलते ब्रह्म’ असा उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच आजच्या काळात समाजमन ओळखण्याची कला महंत उध्दव महाराज मंडलिक यांना अवगत असून उत्सव कसे करावेत, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.
कीर्तनानंतर सप्ताहासाठी विविध सेवा देणाऱ्या दात्यांचा सन्मान म्हस्के महाराजांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सूर्यभान जगताप, संभाजीराव हराळ व दत्तात्रय कांगुणे यांनी संतपूजन सेवा दिली, तर रणजित राजळे यांच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली. दुपारचा भोजन प्रसाद कै. बाबासाहेब गारुळे यांच्या स्मरणार्थ रावसाहेब व सुनील गारुळे यांनी दिला. सायंकाळचा महाप्रसाद समस्त ग्रामस्थ मंडळी बेलपांढरी, साईनाथनगर, लेकुरवाळी आखाडा यांच्या वतीने, तर आमटी प्रसादाची सेवा शिवाजीराव कपाळे यांनी दिली.
महंत उध्दव महाराज मंडलिक यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत करून आभार मानले. दरम्यान, या सोहळ्याला वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.