उद्या संगमनेरमध्ये ‘गोदा ते नर्मदा' जलयात्रेचे शाही स्वागत - आमदार अमोल खताळ
◻️ अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोध्दार केलेल्या श्रीराम मंदिरात महाआरती
या यात्रेचा शुभारंभ उद्या सकाळी १० वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून होणार आहे. अखिल भारतीय स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे आणि होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत युवराज यशवंत होळकर बहाद्दूर यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेला सुरुवात होईल.
नाशिक मार्गे ही जलयात्रा शनिवारी सायंकाळी ५ वाजता संगमनेर शहरात दाखल होईल. घुलेवाडी येथूनच यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले असून संपूर्ण शहर भगवे ध्वज, रांगोळी आणि स्वागत कमानींनी सजले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या श्रीराम मंदिराचा जीर्णोध्दार केला, त्या ऐतिहासिक मंदिरात या जलयात्रेतील स्वयंसेवक आणि वारकरी वंदन करणार आहेत. चंद्रशेखर चौक येथील या मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून, जलसंवर्धनाचा संदेश देणारी शोभायात्रा आकर्षणाचे केंद्र ठरेल.
यात्रेमध्ये सहभागी रथांच्या माध्यमातून जल व्यवस्थापन आणि संवर्धनाबाबत प्रबोधन केले जाणार आहे. अहिल्यादेवींच्या जलक्षेत्रातील कार्यावर आधारित चित्रफीत आणि महायुती सरकारचे ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ अभियान याची माहिती नागरिकांना दिली जाईल. अध्यात्मिक वारसा लाभलेल्या गंगामाई घाटावर यात्रेचा मुक्काम असेल आणि दुसऱ्या दिवशी प्रवरामाईच्या जलपूजनाचा सोहळा संपन्न होऊन जलकलश यात्रेत सुपूर्त केला जाईल.
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजित बैठकीस महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर, तालुक्यातील शेतकरी, वारकरी आणि महिलांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.