चंदनापुरी आणि तळेगाव दिघे येथील शाळांची ‘आदर्श शाळा योजने’साठी निवड
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश!
राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी 'आदर्श शाळा' धोरण जाहीर केले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी २७ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ४७८ शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. या अत्यंत स्पर्धात्मक निवडीमध्ये संगमनेर तालुक्यातील दोन शाळांनी आपले स्थान निश्चित केले आहे.
या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या शाळांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून विद्यार्थ्याना आता शहरी भागातील शाळांच्या तोडीस तोड शैक्षणिक वातावरण उपलब्ध होईल. यामध्ये प्रामुख्याने प्रशस्त आणि हवेशीर अशा आधुनिक वर्गखोल्यांची निर्मिती केली जाणार आहे. डिजिटल शिक्षणावर भर देताना ई-लर्निंग सुविधा, स्मार्ट बोर्ड आणि सुसज्ज संगणक लॅब उभारल्या जातील, ज्यामुळे ग्रामीण भागातील मुले तंत्रज्ञानात मागे राहणार नाहीत. शिक्षणासोबतच शारीरिक विकासासाठी उत्तम क्रीडांगणे आणि खेळाचे साहित्य पुरवले जाईल. तसेच, पिण्याचे शुध्द पाणी, अत्याधुनिक स्वच्छतागृहे आणि शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण करून एक आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण केले जाईल. विशेष म्हणजे, केवळ भौतिक सुविधाच नव्हे, तर विद्यार्थ्याच्या बौध्दिक आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या शाळांमध्ये राबवले जाणार आहेत.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा मिळाव्यात, हा आमचा मुख्य हेतू आहे. जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढावा आणि इथल्या विद्यार्थ्यानी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने जागतिक स्पर्धेत टिकून राहावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चंदनापुरी आणि तळेगाव दिघे ही केवळ सुरुवात असून, तालुक्यातील अधिकाधिक शाळांचा या योजनेत समावेश करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील." असे नमूद केले.
दरम्यान, तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांच्या या निवडीमुळे चंदनापुरी आणि तळेगाव दिघे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील शाळा आता केवळ नावानेच नव्हे तर सुविधांनी सुद्धा 'आदर्श' होणार असल्याने पालक आणि शिक्षण प्रेमींकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.