शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - सौ. प्रभावती घोगरे
◻️ राहात्यात काॅग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
संगमनेर LIVE (राहाता) | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे धिरेंद्र शास्त्री आणि गुंडगिरीची भाषा वापरणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात राहाता तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी काॅग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राहाता तहसीलदार अमोल मोरे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबद्दलचे कोणतेही अवमानास्पद वक्तव्य महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. लोकप्रतिनिधींनी जनतेचा आदर्श व्हायचे असते, मात्र आमदार गायकवाड यांची गुंडगिरीची भाषा अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनाने अशा प्रवृत्तींवर तातडीने आळा घालून कठोर कायदेशीर कारवाई करावी.” अशी मागणी केली.
यावेळी निवेदनासोबतच ज्येष्ठ विचारवंत स्व. कॉ. गोविंद पानसरे लिखित आणि प्रशांत आंबी यांनी प्रकाशित केलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक तहसीलदार अमोल मोरे यांना भेट देण्यात आले. शिवरायांचा खरा इतिहास आणि त्यांचे विचार समाजापर्यत पोहोचावेत, या उद्देशाने हे पुस्तक सुपूर्द करण्यात आले. तसेच या पुस्तकासंदर्भात आमदार गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, अशा बेजबाबदार विधानांमुळे समाजात असंतोष निर्माण होत असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, या निषेध आंदोलनावेळी राहाता तालुका काॅग्रेसचे अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, शिमोन जगताप, सचिन आहेर, दिपक घोगरे यांच्यासह काॅग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सुरेश पानसरे, कानिफनाथ तांबे, बाबा शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.