बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिके घ्यावीत

संगमनेर Live
0
बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिके घ्यावीत

◻️आमदार अमोल खताळ यांच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत प्रशासनाला सूचना 

​संगमनेर LIVE | सध्याच्या हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर भर द्यावा, असा मोलाचा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला. 

संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात आयोजित ‘खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीत’ ते मार्गदर्शन करत होते. कृषी विभागाच्या वतीने आयोजित या बैठकीला उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय कृषि अधिकारी अक्षय गोसावी, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

​यावेळी मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले की, शासकीय बैठका केवळ कागदावर मर्यादित न राहता त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करावे. आगामी हंगामात बियाणे, खते आणि औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. तसेच, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नकली बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रांवर आणि खत विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

​बदलत्या हवामानाच्या संकटावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, हे संकट केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते जागतिक स्वरूपाचे आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला होता आणि यंदा एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने भविष्यात टॅकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते. अशा परिस्थितीत पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करून शेतीमध्ये बदल स्वीकारणे गरजेचे आहे. 

महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे. भविष्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच भासू नये इतके उत्पन्न त्यांच्या हाती मिळावे, यासाठी आधुनिक पर्यायी शेती पद्धती स्वीकारून आत्महत्यामुक्त शेतीसाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, ​या कार्यक्रमाच्या शेवटी, विविध कृषी योजनांचा यशस्वीपणे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकरी व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !