भगवंताच्या प्राप्तीसाठी ‘नामचिंतन’ सर्वात सुलभ साधन - एकनाथ महाराज चत्तर
◻️ सद्गुरु नारायणगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याचे सहावे कीर्तनपुष्प
नेवासे येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात, ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या स्मृती निमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे सहावे कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते.
महाराज आपल्या निरुपणात पुढे म्हणाले की, “आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि श्रध्दापूर्वक पार पाडणे, हाच खरा परमार्थ आहे. माणसाने कणा-कणाने धन आणि तीळ-तिळाने पुण्य साठवले पाहिजे. जेव्हा माणूस भौतिक उपायांना थकतो, तेव्हा तो दैवी उपायांकडे वळतो, मात्र अशा वेळी भोंदू बाबांच्या खोटेपणाला बळी पडू नका. वारकरी संप्रदायात चमत्काराला जागा नाही, तिथे केवळ भक्ती आणि नीतिमत्तेला महत्त्व आहे.”
माऊली ज्ञानेश्वरांच्या कार्याचा गौरव करताना महाराज म्हणाले की, “ज्ञानोबारायांनी ७०० वर्षापूर्वी अध्यात्मातील हुकूमशाही संपवून लोकशाही प्रस्थापित केली. आजच्या तरुण पिढीने आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून तारुण्यात प्रामाणिक कष्ट करायला हवेत. जगात आईसारखे दुसरे दैवत नाही.” शालेय शिक्षणाने पोट भरेल, परंतु आत्मकल्याणासाठी अध्यात्माची जोड असणे अत्यंत आवश्यक आहे. भगवंत व्यक्तीसोबत नाही, तर नेहमी सत्यासोबत राहतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सप्ताहाच्या सहाव्या दिवशी विविध धार्मिक विधी आणि सेवांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रावसाहेब पेचे, एकनाथ डोहाळे, ज्ञानेश्वर औताडे आणि अशोक बत्तासे यांनी संतपूजन सेवा पार पाडली. भाविकांसाठी सकाळचा अल्पोपहार प्रा. रामनाथ ननवरे यांनी कै. सौ. शारदाताई ननवरे यांच्या स्मरणार्थ आयोजित केला होता. दुपारच्या भोजनाचे नियोजन तुकाराम कुंजर व प्रदीप तोडमल यांनी केले, तर सायंकाळचा आमटी-भाकरी महाप्रसाद समस्त ग्रामस्थ नेवासा बुद्रुक, नेवासा खुर्द, नेवासा फाटा आणि रानमळा यांच्या वतीने देण्यात आला. यासोबतच अनिल पेचे, बाळासाहेब जायगुडे, भानुदास रेडे, प्रकाशराव सोनटक्के व भारत बेद्रे यांनी आमटी प्रसादाची सेवा दिली.
दरम्यान, कीर्तनानंतर वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा चत्तर महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि मान्यवर मंडळींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.