सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब थोरात मैदानात!

संगमनेर Live
0
सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब थोरात मैदानात!

◻️​ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोन; शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्याचे आश्‍वासन

​संगमनेर LIVE | ​सुरत-चेन्नई या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला अत्यंत अल्प असल्याने संगमनेर तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. आपल्या जमिनीचा रास्त मोबदला मिळावा, यासाठी सर्वपक्षीय शेतकरी शिष्टमंडळाने काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेत, बाळासाहेब थोरात यांनी तातडीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना थेट फोन लावून या शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, अशी आग्रही मागणी केली.

अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी तालुक्यातील चिंचोली गुरव, तळेगाव, अजमपुर, आरामपूर, वरझडी बुद्रुक, वरझडी खुर्द, हसनाबाद, जुनेगाव, लोहारे, कासारे, सादतपूर, चिंचपूर यासह बारा गावांतून १०८३.८८ हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. मात्र, २०२१-२२ च्या भूसंपादन आराखड्यानुसार, एकरी केवळ सात ते दहा लाख रुपये मोबदला दिला जात आहे. निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे बागायती झालेल्या आणि नगदी पिके घेणाऱ्या जमिनींसाठी हा भाव अत्यंत तुटपुंजा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने जमिनीचे फेरमूल्यांकन करून वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या भेटीनंतर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “शेतकरी स्वतःची जमीन महामार्गासाठी देत आहेत, त्यामुळे त्यांना रास्त भाव मिळालाच पाहिजे ही मागणी अत्यंत योग्य आहे. यापूर्वी नाशिक-पुणे महामार्गासाठी शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला होता. शेतकऱ्यांच्या पाठीशी काॅग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील या बाधित शेतकऱ्यांची व्यथा नितीन गडकरी यांच्यासमोर फोनवरील संवादातून मांडली. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीवर विचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

दरम्यान, ​यावेळी माजी उपसभापती अविनाश सोनवणे, कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, डॉ. संदीप गोर्डे, किसनराव सुपेकर, विलास सोनवणे, शिवनाथ गोरडे, संपत गोर्डे, रावजी गोर्डे, विलास गोर्डे, रवींद्र गोर्डे, प्रकाश सुपेकर, दत्तात्रय गोर्डे, मेजर बाळासाहेब गोर्डे, सचिन गोरडे, बाळासाहेब कोते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !