पिप्री-लौकी अजमपूर येथे वादळाच्या तडाख्याने १० मेंढ्यांचा मृत्यू!
◻️ मेंढपाळ शेतकऱ्यांचे दीड ते दोन लाखांचे नुकसान
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पिंप्री-लौकी अजमपुर परिसरात रविवारी (दि. २४) सायंकाळी झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसाने आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या नैसर्गिक आपत्तीत रावसाहेब मुंढे या मेंढपाळ शेतकऱ्याच्या १० मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे अर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास पिंप्री-लौकी अजमपूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यातच रावसाहेब मुंढे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर वीज कोसळल्याने १० मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने या भागातील शेतकरी आधीच संकटात सापडले असताना, या घटनेने मेंढपाळ कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे सरचिटणीस भारत गिते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. त्यांनी तात्काळ प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. तसेच, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. सोमवारी सकाळी (दि. २५) घटनास्थळी सीताराम दातीर, बाळु दातीर, सचिन दातीर, विनोद लावरे, सुभाष गिते, पोलीस पाटील मच्छिंद्र चकोर, तलाठी आशुतोष वाकडे, संगीता भारत गिते आदिनी उपस्थित राहत पंचनामा केला.
पालकमंत्री विखे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, संबंधित विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करून गरीब मेंढपाळ शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून देण्याचे आदेश दिल्याची माहिती भारत गिते यांनी दिली.
दरम्यान, अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा फटका केवळ मेंढपाळांनाच नव्हे, तर परिसरातील लिंबू बागायतदार शेतकऱ्यांनाही बसला आहे. वादळामुळे लिंबू बागांचेही मोठे नुकसान झाले असून, त्यांचेही तत्काळ पंचनामे करून दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भारत गीते यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे.