महाविकास आघाडी विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार - हर्षवर्धन सपकाळ
◻️ महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची प्राथमिक चर्चा संपन्न
संगमनेर LIVE (मुंबई) | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा आणि नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक, अशा एकूण १७ जागांसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या जागावाटपाबाबतची प्राथमिक चर्चा आज मुंबईतील काॅग्रेस मुख्यालय 'टिळक भवन' येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. येत्या दोन दिवसांत पुन्हा एक महत्त्वाची बैठक घेऊन सर्वसंमतीने जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आयोजित या बैठकीला काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काॅग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर हे प्रमुख नेते उपस्थित होते. मविआमध्ये जागावाटपावरून कोणताही तिढा नसून, अत्यंत सुसंवाद असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “भाजपला लोकशाहीत विश्वास नसून त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे. ‘पैसा फेका आणि तमाशा बघा’ या संस्कृतीचा दुसरा अंक सुरू झाला असून ५ लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी करण्याचे काम सुरू आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूट होऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. दुसरीकडे, गॅग्स ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्येच जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा, या मागणीसाठी नाशिकमधील चांदवड येथे महाविकास आघाडीने पुकारलेल्या आंदोलनाचा व तीन तास चाललेल्या ‘रास्ता रोको’चा धसका भाजपने घेतल्याचे सपकाळ यांनी म्हटले. “शेतकऱ्यांची ताकद पाहून फडणवीस सरकार हादरले आहे, म्हणूनच तातडीने दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत कांदा प्रश्नावर बैठक होत आहे. पण ही बैठक केवळ देखावा नसावी, शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊनच परत या,” असा इशाराही त्यांनी दिला.