आत्मनिर्भर भारताकडे ‘ग्लोब फोर्ज'च्या माध्यमातून अहिल्यानगरची झेप!

संगमनेर Live
0
आत्मनिर्भर भारताकडे ‘ग्लोब फोर्ज'च्या माध्यमातून अहिल्यानगरची झेप!

◻️ तोफगोळ्यांच्या अद्ययावत प्रकल्पाचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण 

संगमनेर LIVE (​शिर्डी) | ‘आत्मनिर्भर भारत' घडवण्याच्या दिशेने अहिल्यानगर जिल्ह्याने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सावळीविहीर येथील औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ‘ग्लोब फोर्ज प्रा. लि.' या कंपनीच्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा ऐतिहासिक शुभारंभ उद्या शनिवार दि. २३ मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा आता देशाच्या संरक्षण उत्पादनाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाणार आहे.

औद्योगिक वसाहतीसाठी तत्कालीन माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या ५०० एकर जमिनीवर हा अद्ययावत प्रकल्प केवळ एका वर्षामध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. उद्योजक गणेश निबे यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प वेगाने पूर्ण झाला. या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेचे प्रतिवर्षी ५ लाख तोफगोळे उत्पादित करण्याची मोठी क्षमता आहे.

लोकार्पण सोहळ्यासाठी सावळीविहीर येथील औद्योगिक वसाहतीचे रुप पालटले आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर भव्य ऐतिहासिक कमान उभारण्यात आली असून, आतमध्ये भारतमाता, हेलिकॉप्टर आणि विमानांच्या प्रतिकृतींनी सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे उभारून इतिहासकालीन संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे व्यासपीठही एका किल्ल्याच्या प्रतिकृतीत सजविण्यात आले आहे.

या सोहळ्याचे औचित्य साधून शनिवार दि. २३ मे आणि रविवार दि. २४ मे २०२६ दरम्यान प्रकल्प स्थळावर संरक्षण प्रणालीशी संबंधित एक भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये रॉकेट, ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि संरक्षण सज्जतेचे अत्याधुनिक साहित्य मांडले असून, शंभरहून अधिक नामांकित कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. हे प्रदर्शन जिल्ह्यातील विद्यार्थी, विज्ञानप्रेमी आणि सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून, आधुनिक तंत्रज्ञान जवळून पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे.

दरम्यान, ​या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर देशाच्या संरक्षण सामर्थ्याचा उदय साईबाबा यांच्या श्रद्धेच्या भूमीतून होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !