गगनगिरी या नावातच सामर्थ्य आणि व्यापकता दडलेली - उल्हासगिरी महाराज
◻️ गुंजाळवाडी येथील सप्ताहात गगनगिरी महाराजांच्या अलौकिक कार्याचा गौरव
संगमनेर LIVE | प. पू्. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची आणि त्यांच्या अलौकिक तपश्चर्येची अनुभूती देणारा सात दिवसीय रामकथा सप्ताह सोहळा संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भक्तांची मोठी उपस्थिती लाभली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना उल्हासगिरी महाराज यांनी स्वामी गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्येचे भावपूर्ण वर्णन केले. ते म्हणाले की, “स्वामी गगनगिरी महाराज हे चौसष्ट कला आणि सहा शास्त्रांचे ज्ञाता होते. गगनगिरी या नावातच आकाश आणि पर्वताप्रमाणे व्यापकता आणि स्थैर्य दडलेले आहे. पाण्यात उभे राहून त्यांनी केलेली तपश्चर्या अद्वितीय असून, मानवी जीवनातील आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारा असा गुरु विरळाच असतो.” ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या कालज्ञान ग्रंथाचा संदर्भ देत त्यांनी महाराजांच्या त्रिकालदर्शी स्वरूपावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाची सुरुवात गगनगिरी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेने झाली. गगनगिरी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटणकर, सरपंच प्रमोद गुंजाळ, आबासाहेब थोरात आणि दिलीप शिंदे यांसह अनेक मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. सरपंच प्रमोद गुंजाळ यांनी यावेळी सप्ताह सोहळ्याची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.
दरम्यान, सोमवारी (दि. ८) अधिक मासानिमित्त आठव्या पर्वातील रामकथेच्या पहिल्या दिवसाच्या कथाप्रसंगाने या सप्ताहाचा अधिकृत प्रारंभ झाला आहे. भक्तांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.