प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला गुंजाळवाडीत शुभारंभ!

संगमनेर Live
0
प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला गुंजाळवाडीत शुभारंभ!

◻️​ कलश मिरवणुक आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला 


​संगमनेर LIVE | अधिकमासानिमित्त संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे प. पू. स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा आज सोमवारी (दि. ८) भव्य मिरवणुकीने उत्साहात शुभारंभ झाला. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला असून, भाविकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे.

संगमनेर बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरापासून सकाळी साडेदहा वाजता या सप्ताहाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. महिला भगिनींनी डोक्यावर कलश धारण करून या मिरवणुकीत सहभाग घेतला, तर हजारो भाविकांनी ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामाचा गजर करत वातावरणात चैतन्य निर्माण केले. सजविलेल्या रथात विराजमान झालेल्या गगनगिरी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणूक अधिकच लक्षवेधी ठरली. तब्बल दोन तास चाललेली ही मिरवणूक सप्ताहस्थळी येऊन संपन्न झाली.

मिरवणुकीनंतर सप्ताहस्थळी स्वामी गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची विधिवत स्थापना आणि घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेश्‍वरी पारायणास सुरुवात झाली. उमेश महाराज दशरथे यांच्या कीर्तनातून उपस्थितांना आध्यात्मिक संदेश देण्यात आला. यावेळी हरिपाठ देखील संपन्न झाला.

दरम्यान, सप्ताहाच्या निमित्ताने आज सोमवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजता ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथेला प्रारंभ होणार आहे. या कथेचा श्रवणीय आनंद घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तर, या सप्ताहामुळे गुंजाळवाडी सह पंचक्रोशीत भक्ती आणि नामस्मरणामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !