प्रवरा कालव्यातून पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांचे आदेश
◻️ उन्हाळी आवर्तनामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यातून बिगर सिंचन आणि सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नदीकाठच्या गावांची पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन उन्हाळा हंगामातील हे दुसरे आवर्तन आहे.
प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यांचे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करावे अशी मागणी शेतकरी, तसेच नदीकाठच्या गावांकडून मोठ्या प्रमाणात होत होती. उन्हाची तीव्रता वाढल्याने बहुतांश गावांतील पाण्याचे स्रोत आटले आहेत. शेतीसह पाणीपुरवठा योजनांनाही पाणी उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी अशी मागणी होत होती.
लोणी येथे जनता दरबाराच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्यासह नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आवर्तनाच्या बाबतीत तातडीने निर्णय करण्याची विनंती केली. मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी धरणातील पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन एकत्रितपणे सोडण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, यामुळे नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुरू होणाऱ्या आवर्तनातून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.