प्रभावती घोगरेकडून ‘सीए’ झालेल्या प्रतीक्षा कुरकुटेचां सन्मान!
◻️ लोणी येथील शेतकरी कुटुंबातील लेकीच्या यशाने पंचक्रोशीत आनंद
संगमनेर LIVE (लोणी) | राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील कन्या कु. प्रतीक्षा उत्तम कुरकुटे हिने देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘चार्टर्ड अकाउंटंट' (सीए) परीक्षा उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश मिळवले आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
प्रतीक्षा ही लक्ष्मणराव कुरकुटे यांची नात आणि उत्तम कुरकुटे यांची मुलगी आहे. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे अनेक आव्हाने समोर असतानाही, तिने शिक्षणाचे ध्येय न सोडता सातत्यपूर्ण अभ्यासाने हे यश मिळवले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसच्या सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे यांनी तिचे विशेष अभिनंदन करत सत्कार केला. याप्रसंगी बोलताना सौ. घोगरे म्हणाल्या की, “प्रतीक्षाचे यश हे संपूर्ण पंचक्रोशीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ग्रामीण भागात प्रचंड क्षमता आहे, हे तिने सिध्द केले आहे. परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हा संदेश तिने आपल्या यशातून दिला आहे.” असे नमूद केले.
यावेळी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनीही तिचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान प्रतीक्षावर पंचक्रोशीतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.