संगमनेरमध्ये ‘फुटबॉल फिव्हर’ फुटबॉल मैदानाचे उध्दघाटन!
◻️ बाळासाहेब थोरातांनी रिमझिम पावसात फुटबॉल खेळण्याचा घेतला आनंद
संगमनेर LIVE | सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे परिसरातील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक ‘लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदान' साकारले आहे. या मैदानाचे उध्दघाटन नुकतेच काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रिमझिम पावसाची साथ आणि हजारो क्रीडाप्रेमींचा मोठा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण अगदी फुटबॉलमय झाले होते.
सध्या जगभरात फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर सुरू आहे, याच धर्तीवर संगमनेरमध्येही या खेळाची आवड निर्माण व्हावी आणि इथून भविष्यात अनेक गुणवंत खेळाडू घडावेत, या उद्देशाने हे मैदान उभारण्यात आले आहे. उध्दघाटन प्रसंगी संगमनेर फुटबॉल क्लब आणि एवरेस्ट फुटबॉल क्लब यांच्यात एक चित्तथरारक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. मैदानावर लावलेल्या ४० फूट मोठ्या स्क्रीनमुळे उपस्थितांना वर्ल्ड कपमधील गोल आणि सामन्याचे महत्त्वाचे क्षण मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची दुर्मिळ संधी मिळाली.
यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, फुटबॉल हा जगातील सर्वात वेगवान आणि लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याचे उदाहरण देऊन त्यांनी सांगितले की, कष्ट आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू जागतिक पातळीवर नाव कमवू शकतात. युवकांनी मोबाईलवर रील पाहण्यापेक्षा फुटबॉलसारख्या खेळांचा आनंद घ्यावा आणि मैदानी खेळांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पावसात भिजत बाळासाहेब थोरात यांनी खेळाचा आनंद घेतला. त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देताना आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ किती गरजेचे आहेत, यावर भर दिला.
हे मैदान आंतरराष्ट्रीय फुटबॉल ग्राउंडच्या आकारानुसार तयार करण्यात आले असून, भविष्यात अधिक सुविधा वाढवून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. तसेच, लवकरच या मैदानाशेजारी क्रिकेटचे भव्य मैदानही उभारले जाणार आहे. या मैदानावर दर रविवारी ‘संगमनेर संडे लीग' अंतर्गत फुटबॉल मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.