आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ‘योग’ हेच समर्थ माध्यम - मंत्री विखे पाटील
◻️ प्रवरेच्या विविध शैक्षणिक संकुलांमध्ये १२ वा योग दिन उत्साहात साजरा
संगमनेर LIVE (लोणी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक संकुलांमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांनी सामूहिक योगसाधनेत सहभागी होत निरोगी जीवनाचा संकल्प केला.
यावेळी बोलताना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात भारताच्या योग साधनेला जागतिक स्तरावर मिळवून दिलेली मान्यता हा देशाचा मोठा गौरव आहे. भारताच्या या प्राचीन ज्ञान परंपरेचे आज जागतिक चळवळीत रूपांतर झाले आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने योग साधनेचा स्वीकार करणे काळाची गरज आहे.”
‘आरोग्यदायी वृध्दत्वासाठी योग’ ही यावर्षीची संकल्पना असून, युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच चांगल्या आरोग्यासाठी योग साधनेचा प्रचार आणि प्रसार करावा, असे आवाहनही ना. विखे पाटील यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये गेल्या २७ वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. संस्थेच्या क्रीडा शिक्षकांना कैवल्यधाम, लोणावळा येथे विशेष शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले असून, सध्या ६५ प्रशिक्षित योग शिक्षकांमार्फत विविध शाळा व महाविद्यालयांत नियमित योग शिबिरे घेतली जात आहेत.
या उपक्रमाबाबत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले की, “केवळ शैक्षणिक संकुलातच नव्हे, तर गावपातळीवरही योग शिबिरांच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जाते. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनीही निरोगी जीवनशैली स्वीकारावी, यासाठी संस्थेचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात.” असे नमूद केले.
दरम्यान, या योग दिनानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते, आणि विद्यार्थ्यांनी विविध योगासने करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.