राज्यातील सिंचन प्रकल्पांना नाबार्डच्या माध्यमातून ५ हजार ३६ कोटींचा निधी मिळणार

संगमनेर Live
0
राज्यातील सिंचन प्रकल्पांना नाबार्डच्या माध्यमातून ५ हजार ३६ कोटींचा निधी मिळणार

◻️ जलसंपदा मंत्री विखे पाटलांकडून राज्यातील ३१ प्रकल्पांना नव संजीवनी

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सिंचन प्रकल्पांना बळ देण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीमुळे कृष्णा खोरे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील प्रकल्पांच्या कामांना मोठी गती मिळणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी सिंचन प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार सत्यजीत पाटील, आमदार अमोल जगताप यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​राज्यातील पूर्ण झालेल्या १५५ जलसिंचन प्रकल्पांच्या कालवे व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी ५ हजार ३६ कोटी रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे २१ प्रकल्प आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे १० प्रकल्प अशा एकूण ३१ प्रकल्पांना प्रथम टप्प्यात प्राधान्य देण्यात आले आहे.

​या प्रकल्पांच्या नियोजनात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाचा टप्पा २ मधून टप्पा १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती आणि भोजापूर मध्यम प्रकल्पांचाही पहिल्या टप्प्यात नव्याने समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नाबार्डकडून निधी उपलब्धतेसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, जेणेकरून सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचन यातील तफावत दूर होऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणे शक्य होईल, असा विश्‍वासही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !