संगमनेर Live | राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत १९० दिवसांमध्ये विक्रमी १३ लाख १३ हजार ३२० मेट्रिक टनाचे गाळप केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांनी पुढील ५० वर्षांचा विचार करून अत्यंत दूरदृष्टीने घेतलेल्या ५५०० मेट्रिक टन व ३० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचा निर्णय हा अत्यंत लाभदायी व राज्याला दिशादर्शक ठरला आहे. २०२० - २१ या चालू हंगामात कारखान्यासाठी अत्यंत अडचणी असतानाही उसाचे विक्रमी उत्पादन, कोरोणाचे संकट, लॉकडाऊनचा प्रश्न, साखरेचे कमी झालेले भाव या सर्व पार्श्वभूमीवर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आपला लौकिक कायम ठेवताना ६ हजार मेट्रिक टनाचे गाळप क्षमता असताना विक्रमी ९ हजार मेट्रिक टनाचे गाळप करत १९० दिवसांमध्ये १३ लाख १३ हजार ३२० मेट्रिक टन इतके गाळप केले आहे.
यापूर्वी या कारखान्याने ११ लाख ५३ हजार मेट्रिक टनाचे गाळप केले होते, तो उच्चांक यावर्षी मोडीत काढला आहे. तसेच नव्याने सुरू केलेल्या डिस्टलरी प्रकल्पातून ९२ लाख लिटरचे उत्पादन झाले आहे. तर विद्युत निर्मितीतून ५३ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. या सर्व कार्यकाळात राज्यभरातील कारखान्यांमधून ऊस गाळपामध्ये पहिल्या पंधरा मध्ये थोरात कारखाना अग्रभागी राहिला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्त, पारदर्शक, काटकसर व कार्यक्षमता चतु सूत्री वापर करून या कारखान्याने कायम इतर कारखान्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे काम केले आहे. तसेच कोरोणा संकटात सातत्याने तालुक्यातील जनतेच्या मदतीला उभे राहताना ५०० बेडचे अद्यावत कोवीड केअर सेंटर कार्यान्वित करून नागरिकांना दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे नव्याने ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट हाती घेतला आहे.
यासर्व वाटचालीबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सर्व सभासद, कारखान्याची हितचिंतक व ऊस उत्पादक व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.