कोथरूड पोलिसांच्या कृतीचा माकपच्या वतीने निषेध!
◻️ रक्षण करणारेच भक्षक झाले आहेत का? - डॉ. अजित नवले
संगमनेर LIVE | चौकशीच्या नावाखाली पोलीस, मुलींच्या रूममध्ये घुसतात. त्यांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न होतो. अत्यंत वाईटरित्या त्यांना प्रश्न विचारले जातात. चौकशीसाठी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तासंतास बसून ठेवले जाते. सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणी या मुलींना बसवून ठेवून वाटेल ते प्रश्न विचारले जातात. त्यांच्या जातीचा वारंवार उल्लेख करून त्यांना अपमानित केले जाते.
एका विवाहितेला सासरच्या त्रासापासून वाचण्यासाठी मदत केली यासाठी या मुलींना पोलिसांकडून अशा प्रकारची वागणूक मिळते. कोथरूड पोलिसांची ही कृती अत्यंत संतापजनक असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांच्या या कृतीचा आम्ही धिक्कार करत आहोत. अशा भावना डॉ. अजित नवले यांनी कळविल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, अशाप्रकारे वागणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी करून सुद्धा गुन्हा दाखल करण्याची टाळाटाळ होते. ज्यांनी समाजाचे रक्षण करायचे तेच भक्षक झाले आहेत का? अशी शंका यामुळे उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व राज्य सरकार यांच्यासाठी हा घडलेला प्रकार शरमेने मान खाली घालायला लावणारा प्रकार आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषींवर तातडीने ॲट्रॉसिटीसह सर्व योग्य कलमे लाऊन गुन्हे दाखल झाले पाहिजेत व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे न झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यभर जोरदार आंदोलन करण्यात येईल. असे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.