पंचनाम्यांचा फार्स न राबवता तातडीने मदत करा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
पंचनाम्यांचा फार्स न राबवता तातडीने मदत करा - बाळासाहेब थोरात

◻️ संगमनेर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी


संगमनेर LIVE | परतीच्या पावसाने अहिल्यानगर व मराठवाडा विभागामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना धीर दिला आणि प्रशासनाला पंचनाम्यांचा फार्स न राबवता तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी केली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सादतपूर आणि निमगावजाळी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. बाळासाहेब थोरात हे बिहार येथे उपस्थित होते. परंतु महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थिती नंतर तातडीने त्यांनी मराठवाड्यातील संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव भागामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. याचबरोबर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली. याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

यानंतर आज संगमनेर तालुक्यातील सादतपूर व निमगावजाळी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सादतपूर येथे रात्री झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. कुटुंब उघड्यावर पडली आहे. पशुधन अडचणीत आले आहे. ही बातमी कळताच सकाळी सात वाजता थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी कार्यकर्त्यासह सादतपूर येथे भेट देऊन नागरिकांना मदत केली.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला. याचबरोबर थोरात कारखान्याच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना जेवणाची व्यवस्था व इतर व्यवस्था पुरवण्यात आली.

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे हे सरकारचे पहिले कर्तव्य आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आला आहे. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेले आहे. सरकारने आता पंचनामा व इतर शासकीय फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची गरज आहे. तातडीने मदत झाली पाहिजे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये होतो. त्यावेळेस पहिले प्राधान्य शेतकऱ्याला वाचवण्याचे दिले आहे. शेतकऱ्याला कायम मदत केली आहे. आता मंत्री येतात पर्यटन करून निघून जातात. मात्र मदतीबाबत काहीही बोलत नाही. राज्यामध्ये पावसाने हाहाकार उडालेला असताना सरकार अद्याप त्यावर कोणतीही ठोस घोषणा करत नाही. केंद्रात व राज्यात भाजपा प्रणित सरकार आहे. शेतकरी अडचणीत असताना त्याला मदत करणे हे सरकारचे काम आहे मात्र असे होत नाही हे दुर्दैव आहे.

शेतातील पिके वाया गेली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. पशुधन मृत्युमुखी पडले आहे. अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. अशा काळात सरकार कुठेही दिसत नाही ही मोठी शोकांतिका असल्याची टीका लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून शेतकरी संतापला तर तुम्हाला फिरणे अवघड होईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितल्या. यावेळी स्थानिक प्रशासन व कारखाना यंत्रणा यशोधन कार्यालय सर्वांच्या मदतीने नागरिकांना तातडीने मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

थोरात कारखान्याची यंत्रणा तातडीने मदतीला..

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हे तालुक्याचे हृदय आहे. कायम तालुक्याच्या जनतेला मदतीचे काम कारखान्याने केले असून रात्री झालेल्या अतिवृष्टीची बातमी कळता सकाळी ७ वाजता इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे कर्मचारी अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांना मदत केली. याचबरोबर सादतपूर येथील सर्व नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना इतर ठिकाणी हलवण्यात मोठी मदत केली आहे. कारखान्याची यंत्रणा ही कायम अडचणीच्या काळात जनतेला मदत करत असल्याचे मोठे वैशिष्ट्य कारखान्याने जपले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !