बंद पडलेले ESIC सेवा दवाखाने आता संगमनेरमध्ये होणार सुरू

संगमनेर Live
0
बंद पडलेले ESIC सेवा दवाखाने आता संगमनेरमध्ये होणार सुरू

​◻️आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठान (ESIC) अंतर्गत बंद करण्यात आलेले सेवा दवाखाने आता संगमनेर येथे स्थलांतरित करून पुन्हा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठानच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, संगमनेर येथे हे सेवा दवाखाने सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

​संगमनेर परिसरात मोठ्या प्रमाणावर विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची संख्या लक्षात घेता, स्थानिक पातळीवर दर्जेदार व तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या महत्त्वाच्या निर्णयामुळे तालुक्यातील १० हजाराहून अधिक विमाधारक लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आता हक्काच्या मोफत आरोग्य सेवा मिळणार आहेत. विशेषतः ज्या कामगारांच्या वेतनातून दरमहा ESIC ची रक्कम वजा केली जाते, त्या सर्वाना या दवाखान्याचा थेट लाभ मिळेल. आता औषधोपचार, विविध वैद्यकीय तपासण्या आणि अन्य आरोग्यसेवांसाठी कामगारांना नाशिक किंवा पुणे यांसारख्या लांबच्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.

​या कामाचा श्रीगणेशा आमदार अमोल खताळ यांनी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी केलेल्या निवेदनाने झाला होता. नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान मालपाणी उद्योग समूहातील कामगारांच्या बैठकीत त्यांनी यासंदर्भात दिलेला शब्द आता पूर्ण झाला आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे प्रभावी पाठपुरावा केला होता, ज्याची दखल घेत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने १२ मार्च २०२५ रोजी मंत्रालय स्तरावरून आवश्यक कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले होते. नागपूर अधिवेशनादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकांमुळे या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आणि अखेर कामगारांच्या हिताचा हा निर्णय प्रत्यक्षात आला.

​या ऐतिहासिक निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, “संगमनेर तालुक्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवेसाठी भटकंती करावी लागू नये, हीच माझी सुरुवातीपासूनची भूमिका होती. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून मान्यता दिली, याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा निर्णय संगमनेरच्या आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी एक मैलाचा दगड ठरेल.” या निर्णयामुळे तालुक्यातील असंघटित आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आमदार खताळ यांचे विशेष आभार मानले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !