ओझर खुर्द येथील नेमबाई देवीच्या डोंगराला आग!

संगमनेर Live
0
ओझर खुर्द येथील नेमबाई देवीच्या डोंगराला आग!

◻️ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील नेमबाई देवी डोंगराला बुधवारी (दि. ८) दुपारी भीषण आग लागली. या आगीत डोंगरावरील वनसंपदा जळून खाक झाली असून परिसरातील जैवविविधतेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास डोंगर पायथ्यापासून धुराचे लोट आकाशात झेपावताना नागरिकांना दिसले. सोशल मीडियावर या धुराचे (आगीचे) व्हिडिओ व्हायरल होताच स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांनी डोंगराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, वाऱ्याचा वेग आणि कोरडा पालापाचोळा यामुळे आग वेगाने पसरत गेली.

नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु तोपर्यत डोंगरावरील लहान-मोठी जंगली झाडे, पालापाचोळा आणि गवत जळून खाक झाले होते. या आगीत केवळ झाडेच नाही, तर डोंगरावर वास्तव्यास असलेल्या पशु-पक्ष्यांची घरटी आणि इतर जैवविविधतेचे देखील नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. ही आग नैसर्गिक कारणाने लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली, याबाबत‌ कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वनविभागाकडून सध्या या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात असला तरी, अंधार आणि इतर अडचणीमुळे पाहणी करण्यात अडथळे येत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसात डोंगराळ भागात वणवा लागण्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी वनविभागाने चोख बंदोबस्त ठेवावा आणि डोंगर परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !