उंबरी बाळापूर शिवारात तिघांवर बिबट्यांचा प्राणघातक हल्ला
◻️ निमगाव जाळी येथे प्राथमिक उपचारानंतर जखमीना नगरला हलवले.
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात बिबट्याने रविवारी सायंकाळी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. लेंडी पुलाजवळून दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर आणि त्यानंतर काही वेळातच एका डॉक्टरांवर बिबट्याने झडप घातल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रुक येथील संदीप खेमनर हे आपल्या दोन पुतण्यांसह रविवारी (दि. ५) सायंकाळी ७:४५ च्या सुमारास प्रवरा डाव्या कालव्याजवळील शेतातून गव्हाचा भुसा ट्रॅक्टरमध्ये भरून परतत होते. यावेळी अभिषेक केशव खेमनर (वय ३४) आणि सार्थक सुनील खेमनर (वय १७) हे मोटार सायकलवरून लेंडी नाल्याजवळून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे दोघांनीही मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून बापूसाहेब निर्मळ, संदीप भुसाळ, विलास निर्मळ, सोमनाथ शिंदे, सचिन शिंदे, पप्पु होडगर आणि पप्पू निर्मळ हे स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. नागरिकांची गर्दी पाहून बिबट्याने तेथून जवळच असलेल्या शेतात उडी मारून पळ काढला.
या घटनेनंतर काही वेळातच उंबरी येथील डॉ. मारुती उंबरकर (वय -५२) हे आपल्या घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. उंबरकर हे देखील जखमी झाले असून तिघांच्या ही पायाला तसेच मांडीला गंभीर दुखापत झाली आहे.
तिन्ही जखमींना तातडीने स्थानिकांच्या मदतीने निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याप्रसंगी डॉ. तय्यब तांबोळी यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. यासाठी त्यांना आरोग्य सेविका वैशाली ठुबे, आरोग्य सेवक तेजस भांड, नरेंद्र पोटे यांनी मदत केली.
तर, या घटनेची माहिती मिळताच जलसंपदा तथा पालकमंत्री मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाने तात्काळ जखमीना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले असून उपचाराबाबत तेथील डॉक्टरांना सूचना देखील दिल्या आहेत.
तसेच या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल आर. के. पवार, वनसंरक्षक राहुल सातपुते, बाळासाहेब डेंगळे आणि अरुण साळवे यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस आणि पंचनामा केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर उंबरी बाळापूर परिसरात दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. कारण यापूर्वीही देखील यांचं परिसरात मानवी हल्ले आणि पशुधनावर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे.