संगमनेर नगरपरिषदेच्या​ ‘हायटेक सीसीटीव्ही नेटवर्क’ व ‘खाऊ गल्ली’चे उद्या लोकार्पण!

संगमनेर Live
0
संगमनेर नगरपरिषदेच्या​ ‘हायटेक सीसीटीव्ही नेटवर्क’ व ‘खाऊ गल्ली’चे उद्या लोकार्पण!

◻️ ​ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे यांची प्रमुख उपस्थिती


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | नागरिकांची सुरक्षितता आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत, संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ यंत्रणेचे लोकार्पण तसेच खवय्यांसाठी उभारण्यात आलेल्या आधुनिक ‘फूड कोर्ट’चे उध्दघाटन उद्या सोमवार, दि. ७ रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. 

हा सोहळा काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा डॉ. सौ. मैथिलीताई तांबे यांनी दिली.

​आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहरातील महिला, युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही यंत्रणेचे व्यापक जाळे उभारण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील त्रिमूर्ती चौक, जनता नगर कॉर्नर, संगमनेर बस स्थानक परिसर, जुनी चावडी व तीन बत्ती चौक, चंद्रशेखर चौक आणि नगरपालिका कोर्ट इमारत या सर्व प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचे सायंकाळी ५ वाजता थेट त्या-त्या ठिकाणी जाऊन लोकार्पण करण्यात येणार आहे.

​नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि हक्काचे खाद्यसंस्कृती केंद्र उपलब्ध व्हावे या उद्देशाने सह्याद्री कॉलेज परिसरातील नेहरू गार्डनजवळ आधुनिक ‘फूड कोर्ट’ (खाऊ गल्ली) साकारण्यात आले असून, सायंकाळी ५:१५ च्या सुमारास या फूड कोर्टचाही शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. 

याच कार्यक्रमादरम्यान संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्‍वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक, संविधान स्मारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक यांच्या कामाच्या प्रगतीची आणि नियोजनाची माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.

​प्रत्यक्ष स्थळांवरील उध्दघाटनांनंतर सायंकाळी ५:३० वाजता संगमनेर नगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सौ. दुर्गाताई तांबे, युवक काॅग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, सौ. प्रमिला अभंग यांच्यासह सर्व विभागांचे सभापती, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, ​शहराच्या विकासात आणि सुरक्षिततेत भर घालणाऱ्या या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संगमनेर शहर व परिसरातील सर्व नागरिक, महिला भगिनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सर्व नगरसेवक व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !