नगरपरिषदेकडून २०० सीसीटीव्ही कॅमेरे व फूड कोर्टचे लोकार्पण
◻️ बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांचा विरोधकांवर घणाघात
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “निवडणुकीनंतर संगमनेरमध्ये राजकारण न करता केवळ विकासाला प्राधान्य देण्याची परंपरा आहे. मात्र सध्या विरोधकांकडून सुरू असलेले राजकारण अत्यंत पोरकटपणाचे आणि दुर्दैवी आहे. आम्ही केलेल्या कामांचे आणि न आणलेल्या निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी करू नये,” असा इशारा कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला. तर, “निधी कसा खेचून आणायचा हे आम्हाला चांगले ठाऊक आहे”, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरात बसविण्यात आलेले २०० अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे, ११ चौकांतील माहिती प्रसारण यंत्रणा (पब्लिक ॲड्रेस सिस्टीम) आणि आधुनिक ‘फूड कोर्ट’चे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “१९९२ मध्ये डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यापासून संगमनेरच्या शाश्वत विकासाची पायाभरणी झाली. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन आणल्यामुळे आज संगमनेरकरांना मुबलक पाणी मिळत आहे. नगरपरिषदेच्या नव्या टीमने गेल्या आठ महिन्यांत दर्जेदार कामगिरी केली आहे. सुरक्षिततेसाठी २०० सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक पोलिसांनी अनुपस्थित राहणे हे न उलगडणारे कोडे आहे.”
नागरिकांच्या सहभागातून सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे निर्माण करून शहराला अधिक सुंदर बनविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “नगरपरिषदेसाठी मंजूर झालेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला गेला, तरीही विकासात अडथळा नको म्हणून आम्ही तातडीने ना-हरकत प्रमाणपत्र दिले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आलेल्या निधीबद्दल आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जाहीर आभार मानतो. मात्र, ज्या कामांत विरोधकांची साधी शिफारस नव्हती, त्याचे श्रेय त्यांनी लाटू नये.”
सौ. दुर्गाताई तांबे यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचे सांगत तांबे म्हणाले, “माहिती अधिकाराचा गैरवापर करून ब्लॅकमेल करण्याचे धंदे शहरात खपवून घेतले जाणार नाहीत. आगामी काळात धूळमुक्त शहरासाठी आधुनिक यंत्रणा आणली जाईल. पुढील पाच वर्षांत संगमनेरचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलेल.”
तसेच “तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडून आम्ही या जागेची मंजुरी मिळवली, तेव्हा आज श्रेय घेणाऱ्यांचा राजकारणात दूरवर संबंध नव्हता,” असा टोला आमदार सत्यजीत तांबे यांनी लगावला.
नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी नगरपरिषदेच्या कामांचा आढावा घेताना सांगितले की, “शहरात महिला सुरक्षेसाठी विशेष ‘रक्षक दल’, ई-टॉयलेटची सुविधा आणि भटक्या श्वानांचे लसीकरण प्रभावीपणे राबविले जात आहे. ‘संगमनेर २.०’ ही केवळ घोषणा नसून स्वच्छ, सुंदर आणि हरित संगमनेरसाठीची आमची कृतीशील कटिबद्धता आहे.” असे नमूद केले.
यावेळी डॉ. सुधीर तांबे यांनी नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून शहर स्वच्छतेत सक्रिय हातभार लावण्याचे आवाहन केले, तर श्रीमती सुवर्णाताई मालपाणी यांनी थोरात-तांबे परिवाराच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान आमदार सत्यजीत तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी शहरातून दुचाकीवरून पाहणी फेरी काढली. विविध चौकांमध्ये हजारो नागरिक, महिला व युवकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. सुवर्णाताई मालपाणी, आमदार सत्यजीत तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. सौ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलास लोणारी, अरुण वाकचौरे, नगरसेवक सौ. अर्चना दिघे, सौरभ कासार, सौ. सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौ. शोभा पवार, डॉ. अनुराधा सातपुते, सौ. प्राची कवडे, किशोर पवार, गजेंद्र अभंग, सौ. वनिता गाडे, सौ. मालती डाके, नितीन अभंग, सौ. दिपाली पंचारिया, अमजद खान पठाण, विजया गुंजाळ, गणेश गुंजाळ, शकीला बेग, नूर मोहम्मद शेख, शहानवाज खान, सौ. सरोजना पगडाल, किशोर टोकसे, सौ. प्रियंका शाह, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, स्विकृत नगरसेवक जावेद खान पठाण, सोमेश्वर दिवटे, सौ. रचना मालपाणी, मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे, निखिल पापडेजा, धनंजय डाके, सुधाकर जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
संगमनेर हायटेक बस स्थानकासमोरील परिवहन विभागाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि शहीद स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकांच्या प्रतिकृतींचे अनावरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या स्मारकांसाठी संग्राम पतसंस्थेतर्फे ५ लाख रुपये, तर ज्येष्ठ पत्रकार किसन हासे यांच्या युवावार्ता परिवारातर्फे ११ हजार रुपयांची लोकवर्गणी सुपूर्द करण्यात आली.